दाभीळजवळ गर्डर बसवण्यासाठी मुंबई-गोवा महामार्ग तासभर बंद; भर पावसात वाहनचालक आणि प्रवासी हैराण

खेड : प्रतिनिधी
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील दाभीळजवळ सुरू असलेल्या पुलाच्या कामादरम्यान ठेकेदाराच्या नियोजनशून्य कारभाराचा फटका हजारो वाहनचालकांना आणि प्रवाशांना बसला. पुलावर अवजड गर्डर बसविण्याच्या कामासाठी कोणतीही पूर्वसूचना न देता महामार्गावरील वाहतूक तब्बल एक तास पूर्णपणे बंद ठेवण्यात आली. त्यामुळे मुसळधार पावसात महामार्गाच्या दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागून वाहतूक कोंडी निर्माण झाली.
मंगळवारी दुपारच्या सुमारास दाभीळ परिसरातील पुलावर गर्डर बसविण्याचे काम अचानक सुरू करण्यात आले. या कामासाठी वाहतूक वळविण्याची किंवा काही काळासाठी बंद ठेवण्याची कोणतीही अधिकृत माहिती वाहनचालकांना किंवा स्थानिक प्रशासनाकडून देण्यात आली नव्हती. त्यातच परिसरात मुसळधार पाऊस सुरू असल्याने अचानक थांबलेल्या वाहतुकीमुळे नेमके काय घडले आहे, याबाबत अनेक प्रवासी आणि वाहनचालक संभ्रमात पडले होते.
वाहतूक बंद झाल्यानंतर काही मिनिटांतच वाहनांची संख्या वाढत गेली आणि महामार्गाच्या दोन्ही बाजूंना किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या. एसटी बसेस, खासगी वाहने तसेच मालवाहू ट्रक या कोंडीत अडकून पडले. पावसामुळे वाहनांमधून बाहेर पडणेही प्रवाशांसाठी कठीण झाले होते. लहान मुले, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना या परिस्थितीचा मोठा त्रास सहन करावा लागला.
तब्बल एका तासानंतर गर्डर बसविण्याचे काम पूर्ण झाल्यानंतर वाहतूक संथ गतीने सुरू करण्यात आली. मात्र, ऐन पावसाळ्यात कोणतेही योग्य नियोजन न करता महामार्गावरील वाहतूक रोखून धरल्यामुळे ठेकेदाराच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. तसेच या संपूर्ण प्रकारात वाहतूक नियंत्रणासाठी जबाबदार असलेल्या पोलिसांच्या भूमिकेवरही वाहनचालकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
घटनास्थळी उपस्थित असलेल्या अनेक वाहनचालकांनी वाहतूक पोलिसांनी केवळ बघ्याची भूमिका घेतल्याचा आरोप केला. ठेकेदाराला महामार्ग रोखण्याची परवानगी कोणी दिली आणि वाहतूक व्यवस्थापनासाठी आवश्यक उपाययोजना का करण्यात आल्या नाहीत, असा सवाल संतप्त प्रवाशांकडून उपस्थित केला जात आहे.
ठाणे येथील वाहनचालक समीर डोईफोडे यांनी सांगितले की, पावसाळ्यामुळे आधीच रस्ते निसरडे झाले आहेत. अशा परिस्थितीत कोणतीही पूर्वसूचना न देता तासभर महामार्ग बंद ठेवणे अत्यंत गैरसोयीचे ठरले. पोलिसांनी ठेकेदाराला जाब विचारण्याऐवजी शांत भूमिका घेतली. प्रशासनाने या प्रकरणाची चौकशी करून संबंधित ठेकेदारावर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली.
दरम्यान, महामार्ग विभागाचे अभियंता पंकज गोसावी यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, अशा प्रकारची कामे करताना कामाच्या ठिकाणापासून दोन ते तीन किलोमीटर अंतरावर योग्य बॅरिकेडिंग करणे आणि वाहनचालकांना पूर्वसूचना देणे आवश्यक असते. संबंधित ठिकाणी अशा काही त्रुटी आढळल्यास त्या बाबत ठेकेदाराला योग्य सूचना दिल्या जातील, असे त्यांनी स्पष्ट केले.
या घटनेमुळे मुंबई-गोवा महामार्गावरील सुरू असलेल्या कामांमध्ये सुरक्षितता, नियोजन आणि वाहतूक व्यवस्थापनाचा अभाव पुन्हा एकदा समोर आला असून संबंधित यंत्रणा याकडे गांभीर्याने लक्ष देणार का, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.