ज्येष्ठ नाट्यदिग्दर्शिका विजया मेहता यांचं वयाच्या ९२व्या वर्षी निधन

मुंबई :           मराठी रंगभूमीचं एक युग आज संपलं आहे. ज्येष्ठ नाट्यदिग्दर्शिका, अभिनेत्री आणि नाट्यप्रशिक्षक विजया मेहता यांचं वयाच्या ९२व्या वर्षी निधन झालं. त्यांच्या निधनानं मराठी नाट्यसृष्टी आणि समांतर चित्रपटसृष्टीतील एका सुवर्णपर्वाची जणू सांगता झाली आहे. ४ नोव्हेंबर १९३४ रोजी बडोदा येथे जन्मलेल्या विजया मेहता यांना मराठी रंगभूमीवर प्रेमानं “बाई” म्हणून ओळखलं जात असे. विशेष म्हणजे, विजय तेंडुलकर यांनी त्यांना “बाई” असं आदरानं संबोधण्याची सूचना केली होती. त्यावेळी त्या अवघ्या २१ वर्षांच्या होत्या. मात्र, आपल्या कर्तृत्वाने, शिस्तबद्ध कामगिरीने आणि नाट्यसृष्टीतील अमूल्य योगदानाने त्यांनी हे “बाई” हे नाव अगदी सार्थ ठरवलं. त्यांच्या दिग्दर्शनातून नाना पाटेकर, विक्रम गोखले, नीना कुलकर्णी यांसारखे अनेक दिग्गज कलाकार घडले. १९६० मध्ये विजय तेंडुलकर, श्रीराम लागू आणि अरविंद देशपांडे यांच्यासह त्यांनी ‘रंगायन’ या संस्थेची स्थापना केली आणि प्रायोगिक मराठी रंगभूमीला नवी दिशा दिली.

रंगभूमीबरोबरच चित्रपट क्षेत्रातही त्यांनी मोलाचं योगदान दिलं. ‘रावसाहेब’, ‘पेस्तनजी’, ‘स्मृतिचित्रे’ यांसारख्या कलाकृतींनी राष्ट्रीय स्तरावर त्यांना वेगळी ओळख मिळवून दिली. त्यांच्या ‘झिम्मा’ या आत्मचरित्रालाही मोठी लोकप्रियता मिळाली. विजया मेहता यांनी राष्ट्रीय नाट्य विद्यालयाच्या संचालक म्हणूनही जबाबदारी सांभाळली. त्यांना पद्मश्री, संगीत नाटक अकादमी पुरस्कार आणि अनेक राष्ट्रीय पुरस्कारांनी गौरविण्यात आलं. विजया मेहता या केवळ दिग्दर्शिका नव्हत्या, तर त्या अनेक पिढ्यांच्या कलाकारांच्या गुरू होत्या. त्यांच्या कार्यामुळे मराठी रंगभूमीला नवी ओळख, नवी दिशा आणि जागतिक स्तरावर मानाचं स्थान मिळालं. त्यांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी कधीही भरून निघणार नाही. ज्येष्ठ नाट्यदिग्दर्शिका, अभिनेत्री आणि नाट्यप्रशिक्षक विजया मेहता यांना भावपूर्ण श्रद्धांजली.