इन्सुली घाटीत सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानची तत्परता

रस्त्यावरील झाडे व वेली हटवून वाहतूक केली सुरळीत

सावंतवाडी:तालुक्यातील इन्सुली घाटी येथे रस्त्यावर झाडे आणि वेली पडल्यामुळे झालेली वाहतूक कोंडी सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी तात्काळ दूर केली. कार्यकर्त्यांनी दाखवलेल्या या तत्परतेमुळे वाहनधारकांना मोठा दिलासा मिळाला असून, त्यांच्या या निस्वार्थ कार्याचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

इन्सुली घाटी येथील मुख्य रस्त्यावर अचानक झाडाच्या फांद्या आणि वेली तुटून पडल्या होत्या. रस्त्याच्या मधोमध लटकणाऱ्या या वेलींमुळे या मार्गावरील वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण झाला होता, ज्यामुळे पाहता पाहता रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागून मोठी ट्रॅफिक कोंडी झाली.

या घटनेची माहिती सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांना मिळताच, संस्थेचे सदस्य सुजय सावंत आणि लक्ष्मण कदम यांनी कसलाही विलंब न लावता तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून या कार्यकर्त्यांनी एका डंपरवर चढून रस्त्यामध्ये अडथळा ठरणाऱ्या आणि लटकणाऱ्या वेली व झाडांच्या फांद्या तोडल्या. काही मिनिटांतच त्यांनी रस्ता पूर्णपणे साफ करत रखडलेल्या वाहतुकीला मार्ग मोकळा करून दिला.

कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीमध्ये प्रशासनाची वाट न बघता, त्यांचे काम हलके करण्यासह संकटात सापडलेल्या नागरिकांना निस्वार्थपणे सहकार्य करण्यात सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान नेहमीच अग्रेसर असते. आजच्या या घटनेत सुजय सावंत आणि लक्ष्मण कदम यांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे प्रवाशांचा मोठा वेळ वाचला. या सेवाभावी कार्याबद्दल परिसरातून या संस्थेचे आणि कार्यकर्त्यांचे जाहीर आभार मानले जात आहेत.