दोडामार्ग तालुका आपत्ती व्यवस्थापनाची बैठक रखडली; दीपक गवस यांची जिल्हाधिकार्‍यांकडे तीव्र नाराजी

​तातडीने बैठक घेण्याचे जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांचे तहसीलदारांना निर्देश

​दोडामार्ग:प्रतिनिधी

मान्सूनचे आगमन झाले तरीही दोडामार्ग तालुक्यात दरवर्षी आयोजित केली जाणारी आपत्ती व्यवस्थापनाची पूर्वतयारी बैठक यंदा अद्याप झाली नसल्याने प्रशासकीय नियोजनाविरोधात तीव्र संताप व्यक्त होत आहे. विविध विभागांतील अधिकारी व कर्मचाऱ्यांची संपर्क यादीही अद्याप प्रसिद्ध करण्यात आली नसल्याबद्दल माजी जिल्हा परिषद सदस्य तथा भाजपचे दोडामार्ग तालुकाध्यक्ष दीपक गवस यांनी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्याकडे कैफियत मांडत तीव्र नाराजी व्यक्त केली. यावर गांभीर्याने दखल घेत जिल्हाधिकार्‍यांनी तातडीने बैठक घेण्याचे आदेश तहसीलदार राहुल गुरव यांना दिले आहेत.
​जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे या सोमवार दोडामार्ग दौऱ्यावर आल्या होत्या. या दरम्यान तालुक्यात विविध प्रश्नांवरून आंदोलने करण्यात आली होती. जिल्हाधिकार्‍यांनी या आंदोलनकर्त्यांना चर्चेसाठी बोलावले होते. या बैठकीदरम्यान दीपक गवस यांनी तालुका आपत्ती व्यवस्थापन बैठक अद्याप झाली नसल्याकडे जिल्हाधिकार्‍यांचे लक्ष वेधले.

​’प्रशासनाने तालुक्याला वाऱ्यावर सोडले!’

भाजपचे ​दीपक गवस आणि पंचायत समितीचे माजी उपसभापती तथा शिवसेना (शिंदे गट) दोडामार्ग तालुकाप्रमुख गणेशप्रसाद गवस यांनी प्रशासनाच्या निष्क्रियतेवर बोट ठेवत तालुका आपत्ती व्यवस्थापनाच्या कार्यपद्धतीवर संताप व्यक्त केला.

​”मुसळधार पावसामुळे रस्त्यावर झाडे पडणे, वाहतूक विस्कळीत होणे किंवा अन्य कोणतीही आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास नागरिकांनी नेमके कोणाशी संपर्क साधायचा? प्रशासनाने याबाबत कोणतीही स्पष्ट व्यवस्था केलेली नाही. पोलीस आणि प्रशासनाने दोडामार्ग तालुक्याला अक्षरशः वाऱ्यावर सोडले आहे. आपत्ती व्यवस्थापनासारख्या अत्यंत महत्त्वाच्या विषयातही आवश्यक ती पूर्वतयारी दिसून येत नाही. नागरिकांच्या सुरक्षिततेशी संबंधित बाबींमध्ये प्रशासनाने अधिक जबाबदारीने काम करण्याची गरज आहे.”
– दीपक गवस (तालुकाध्यक्ष, भाजप)

​धोकादायक झाडे हटवण्याची मागणी

​बैठकीत गणेशप्रसाद गवस यांनीही एक महत्त्वाचा आणि गंभीर मुद्दा उपस्थित केला. एमएसआयडीसीच्या (MSIDC) रस्त्यालगत असलेली अनेक झाडे सध्या अत्यंत धोकादायक अवस्थेत असून ती मुसळधार पावसात कधीही कोसळू शकतात. संभाव्य जीवित व वित्तहानी टाळण्यासाठी ही झाडे तातडीने हटविण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले.

​जिल्हाधिकार्‍यांचे तहसीलदारांना कडक निर्देश

​लोकप्रतिनिधींनी मांडलेली कैफियत आणि जनतेची गैरसोय लक्षात घेऊन जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी तात्काळ तहसीलदार राहुल गुरव यांना आदेश दिले. सर्व संबंधित विभागांशी समन्वय साधून आवश्यक त्या सूचना तातडीने देण्याचे निर्देश त्यांनी दिले. तसेच आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना तात्काळ मदत मिळण्यासाठी संपर्क व्यवस्था (Help-line numbers) प्रभावी करण्यावर भर देण्यास सांगितले.

​जिल्हाधिकार्‍यांच्या या कडक निर्देशानंतर आता दोडामार्ग तालुका प्रशासन किती वेगाने आणि प्रभावीपणे पावले उचलणार, याकडे संपूर्ण तालुकावासियांचे लक्ष लागले आहे.