शेती विषयक उपक्रमात विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग
परुळे : प्रतिनिधी
बदलत्या काळानुसार आधुनिक शेती तंत्रज्ञानाचा स्वीकार करताना पारंपरिक शेतीतील मूल्ये जपून शेती केली पाहिजे. शेतीतील नव्या संधी, आधुनिक यंत्रसामग्रीचा वापर आणि कृषी क्षेत्रातील बदल याविषयी अभ्यास करून शेती केल्यास मोठा फायदा होणार आहे. दरम्यान ‘बांधावरची शाळा – शेतीची जुनी व नवी कार्यपद्धती’ या आजच्या उपक्रमातून विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची सांगड घालत पारंपरिक शेतीची ओळख करून देण्यात आली असल्याचे प्रतिपादन सिंधुदुर्ग जिल्हा परिषद अध्यक्ष श्री. प्रमोद कामत यांनी केले.
जिल्हा परिषद सिंधुदुर्ग, इंडियन ऑइल पंपचे डीलर लक्ष्मीनारायण पेट्रोलियम, कुडाळ आणि प्रभू कृषी सेवा केंद्र, कुडाळ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘बांधावरची शाळा – शेतीची जुनी व नवी कार्यपद्धती’ हा उपक्रम अण्णासाहेब देसाई विद्यामंदिर, परुळे येथे आज सोमवार ६ जुलै रोजी आयोजित करण्यात आला. हा उपक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी जिल्हा परिषद उपाध्यक्ष श्री. तुकाराम (दादा) साईल, शिक्षण व आरोग्य सभापती श्री. प्रितेश राऊळ, वेंगुर्ला पंचायत समितीचे उपसभापती श्री. सचिन देसाई, जिल्हा परिषद सदस्या सौ. यज्ञा साळगावकर, पंचायत समिती सदस्य श्री. विष्णू फणसेकर, मेढा गावचे सरपंच श्री. अवधूत रेगे, संस्थाध्यक्ष श्री. अविनाश देसाई, उपाध्यक्ष डॉ. उमाकांत सामंत, सीईओ श्री. अमेय देसाई, लक्ष्मीनारायण पेट्रोलियमचे ओंकार देसाई, प्रभू कृषी सेवा केंद्राचे विपुल प्रभू, मुख्याध्यापक श्री. सचिन माने, श्री. प्रसाद पाटकर तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमा प्रसंगी शाळेतर्फे सर्व मान्यवरांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. त्यानंतर मनोगत व्यक्त करताना जिल्हा परिषद अध्यक्ष श्री. प्रमोद कामत यांनी विद्यार्थ्यांना शेती विषयक माहिती दिली. इतर मान्यवरांनी विद्यार्थ्यांना समजेल असे शेती विषयी मार्गदर्शन केले. यानंतर आजारवाडी येथील शेतात विद्यार्थ्यांसाठी प्रत्यक्ष प्रात्यक्षिकांचे आयोजन करण्यात आले. यावेळी सर्व मान्यवरांनी विद्यार्थ्यांसोबत आधुनिक शेती अवजारांची माहिती घेतली व यंत्रांच्या सहाय्याने तसेच पारंपरिक नांगर आणि बैलजोडीच्या साहाय्याने शेतीची प्रात्यक्षिके करून दाखविली. विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष शेतात उतरून शेतीकामाचा अनुभव घेत मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदविला.
या उपक्रमादरम्यान लक्ष्मीनारायण पेट्रोलियम आणि प्रभू कृषी सेवा केंद्र, कुडाळच्या विपुल प्रभू यांच्या वतीने शेतकऱ्यांना मोफत रेनकोट, छत्र्या आणि इंजिन ऑइलचे वितरण करण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांना पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत मोफत रोपांचे वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभवातून शेतीचे महत्त्व, आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती आणि कृषी क्षेत्राबद्दल आत्मीयता निर्माण करणारा हा उपक्रम सर्वांच्या विशेष पसंतीस उतरला.













