कल्याण-डोंबिवलीतील डॉक्टरांवरील हल्ल्याचा खेड जीपीएकडून तीव्र निषेध; दोषींवर कठोर कारवाईची मागणी

खेड | प्रतिनिधी:

कल्याण-डोंबिवली महापालिका रुग्णालयात ड्युटीवर असलेल्या डॉक्टर, महिला डॉक्टर तसेच परिचारिकांशी झालेली शिवीगाळ, मारहाण आणि धमकीच्या घटनेचा खेड जनरल प्रॅक्टिशनर्स असोसिएशन (KGPA) यांनी तीव्र शब्दांत निषेध नोंदविला आहे. या प्रकरणातील दोषींना तात्काळ अटक करून त्यांच्यावर कठोर फौजदारी कारवाई करण्यात यावी, अशी मागणी संघटनेने राज्य शासनाकडे केली आहे.
नुकत्याच घडलेल्या या घटनेत स्थानिक नगरसेवक आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी रुग्णालयात घुसून ड्युटीवर असलेल्या डॉक्टर, महिला डॉक्टर आणि परिचारिकांना अत्यंत असभ्य व अश्लील भाषेत शिवीगाळ करत मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. संबंधित घटनेचे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, वैद्यकीय क्षेत्रातून संताप व्यक्त केला जात आहे.
या घटनेचा निषेध करण्यासाठी खेड जनरल प्रॅक्टिशनर्स असोसिएशनतर्फे खेड येथील प्रांताधिकारी, तहसीलदार आणि पोलीस निरीक्षक यांना शासनाचे प्रतिनिधी म्हणून निवेदन सादर करण्यात आले. निवेदनात रुग्णसेवा करणाऱ्या डॉक्टर आणि परिचारिका दिवस-रात्र अविरतपणे नागरिकांच्या सेवेसाठी कार्यरत असतात. अशा सेवाभावी कर्मचाऱ्यांवर हल्ला करून त्यांना धमकावणारे गुंडप्रवृत्तीचे राजकारणी आणि त्यांचे सहकारी हे समाजासाठी तसेच विशेषतः महिलांच्या सुरक्षेसाठी गंभीर धोका असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
राज्य शासनाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन दोषींना तात्काळ अटक करावी, त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करून कोणत्याही राजकीय दबावाला बळी न पडता कठोर शिक्षा द्यावी, तसेच राज्यातील डॉक्टर, परिचारिका आणि इतर आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी संघटनेने निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदन सादर करताना खेड जनरल प्रॅक्टिशनर्स असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. परेश मळणगांवकर, सचिव डॉ. सिद्धेश चिखले, डॉ. प्रसन्न बाळ, डॉ. अजित भोसले, डॉ. प्रवीण राठोड आणि डॉ. अखिल पवार उपस्थित होते. संघटनेने अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी प्रशासनाने कठोर भूमिका घेण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.