मार्ग फलक आणि NCMC कार्डाबाबत सुधीर आडीवरेकर आक्रमक
सावंतवाडी:भाजप प्रणित सेवाशक्ती संघटनेच्या वतीने सावंतवाडी आगारातील विविध प्रलंबित प्रश्नांबाबत नोव्हेंबर २०२५ मध्ये पत्रव्यवहार करण्यात आला होता. मात्र, दीर्घकाळ उलटूनही या मागण्या पूर्ण न झाल्याने आगाराध्यक्ष, नगरसेवक तथा सावंतवाडी भाजपा मंडळ अध्यक्ष सुधीर आडीवरेकर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने आगार व्यवस्थापकांना तीव्र शब्दांत धारेवर धरले. प्रवाशांच्या छळाबाबत आक्रमक भूमिका घेत दोन दिवसांत नवीन मार्ग फलक (बोर्ड) तयार करणे आणि NCMC कार्डाच्या नावाखाली होणारी प्रवाशांची लूटमार थांबवण्याची जोरदार मागणी यावेळी करण्यात आली.
सावंतवाडी आगारातील गाड्यांचे मार्ग फलक बोर्डिंग कडून केले जात असल्याचे प्रत्यक्ष गाडीसमोर उभे राहून श्री. सुधीर आडीवरेकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी आगार व्यवस्थापकांच्या निदर्शनास आणून दिले. हे मार्ग फलक दोन दिवसांत नवीन तयार करण्यात यावेत, अशी तंबी त्यांनी प्रशासनाला दिली.
त्याचप्रमाणे, सावंतवाडीमधील नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड (NCMC) एजन्सीधारक कार्डची मूळ किंमत १९९ रुपये असतानाही, प्रवाशांकडून त्यापेक्षा जास्त पैसे आकारून लूट करत असल्याच्या तक्रारी प्रवाशांनी सुधीर आडीवरेकर यांच्याकडे केल्या होत्या. या गंभीर समस्येवरही शिष्टमंडळाने आगार व्यवस्थापकांना जाब विचारला आणि ही लूट तात्काळ थांबवण्याची मागणी केली. या विविध प्रश्नांवर आगार प्रशासनासोबत तीव्र शब्दांत चर्चा करण्यात आली.
यावेळी नगरसेवक आनंद नेवगी, नगरसेवक प्रतीक बांदेकर, नगरसेवक ॲड. सिद्धार्थ भांबुरे, भाजपा पदाधिकारी दिलीप भालेकर, संतोष तलवणेकर, अमित गवंदळकर, पडते, पंकज टेमकर, आणि नागेश जगताप उपस्थित होते. तसेच संघटना व प्रशासनाच्या वतीने आगार सचिव बाबू माणगावकर, बी. जे. तुळसकर, लक्ष्मण बरागडे, डी. व्ही. गावडे, आणि एम. एस. शेख हे देखील उपस्थित होते.
सेवाशक्ती संघटनेने प्रवाशांच्या हितासाठी घेतलेल्या या आक्रमक भूमिकेमुळे आणि आगार प्रशासनाला दिलेल्या इशाऱ्यामुळे सर्वसामान्य प्रवासी वर्गातून समाधान व्यक्त केले जात आहे.













