वार्तापत्र -कोकण
संतोष वायंगणकर.
सिंधुदुर्गातील दशावतार, रत्नागिरी जिल्ह्यातील नमन, जाखडी, रायगड जिल्ह्यातील आदिवासी तारफा नृत्य या सर्वांची चर्चा या पावसाळी अधिवेशनात होऊ शकली. आ.निलेश राणे यांनी दशावतार या लोककलेच्या उपेक्षेचे वास्तववादी चित्र विधीमंडळात मांडले. यामुळे महाराष्ट्राचे सांस्कृतिक मंत्री, कोकणचे सुपूत्र ना.आशिष शेलार यांनीही आ.निलेश राणे यांच्या भाषणाची गांभिर्याने दखल घेत दशावतार,नमन , जाखडी कलाकारांना देण्यात येणाऱ्या अनुदानात २.२२ कोटींवरून ४.४० कोटींपर्यंत दुप्पट वाढ केली आहे.हे अनुदान आता थेट कलाकारांच्या बँक खात्यात जमा होईल असे सांस्कृतिक मंत्र्यांनी जाहीर केले आहे.कलावंतामध्ये यामुळे मोठा उत्साह निर्माण झाला आहे…
महाराष्ट्रातील विविध प्रांतातील लोककला जीवंत ठेवण्यासाठी, या कलेचे संवर्धन करण्यासाठी त्या-त्या पिढीचे योगदान फार मोठे राहिलेले आहे. कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लोककलांच्या बाबतीतही त्या-त्या जिल्ह्यातील लोककलावंतांनी अत्यंत कष्टपूर्वक जोपासली आहे. कोकणात भजन, नमन, जाखडी, दशावतार या लोककला आजही या कलेमध्ये काम करणाऱ्यांनी चांगल्या पद्धतीने जपली आहे. या लोककला जोपासणाऱ्या कलावंतांना खरंतर फार काही त्यातून मिळत नाही. परिस्थितीशी संघर्ष करत लोककला जपली जाते. या लोककला संवर्धनात लोकाश्रय आणि राजाश्रय महत्वाचा असतो. लोककला जतन करण्यासाठी समाजातील काही ठराविक वर्ग पुढे येतो. परंतु त्याला जे एक स्वरूप प्राप्त होऊन मोठ्या प्रमाणावर ही लोककला जोपासली जाण्यासाठी सर्वच समाज व्यवस्थेतील अनेक हात पुढे येणे अपेक्षित असते तसे होताना दिसत नाही. समाजातील काही सामाजिक जाणिवेने काम करणाऱ्या घटकांना निश्चितपणे सहकार्याची भुमिका रहाते. त्यामुळेच तर आजही लोककलेची पालखी खांद्यावर घेऊन त्या पालखीचे भोई असणाऱ्यांकडुन कलेचा हा जागर पुढे नेण्याचा प्रयत्न निश्चितपणे होतोच आहे. परंतु कोणतीही लोककलेची जपणुक ही लोकाश्रय आणि राजाश्रयावरच पुर्णत: अवलंबून रहाते टिकते अन विस्तारते सुध्दा!
राजेराजवाड्यांच्याकाळात राजांनी, संस्थांनीकांनी राजाश्रय दिल्यामुळेच त्याकाळी अन्य कोणतीही साधन नसताना लोककला बहरली, एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे मार्गक्रमीत झाली. कोकणातील दशावतार, नमन, जाखडी, आदिवासी-तारफा या लोककलेला म्हणावा तसा राजाश्रय मिळाला नाही. त्यामुळे कोकणात या लोककलांमध्ये काही लोककलावंतांनी स्वत:ची आवड, हौस, छंद जोपासण्यासाठी स्वत:ची आणि त्याच्या कुटुंबाची उपासमार सहन करत ही लोककला जिवंत ठेवण्याचा प्रयत्न केला. सिंधुदुर्गातील दशावतारी कला देखिल कोकणातील कलावंतांनी कोणत्याही सोई-सुविधा नसताना गावो-गावी दहा-वीस मैल पायी चालत जात. दशावतार जिवंत ठेवला पंचवीस वर्षापूर्वी दशावतार याच लोककलेतून मनोरंजन होत होतं. सिंधुदुर्गात तर दशावतार व्यतिरिक्त आजही मनोरंजनाची अनेक दालन खुली असतानाही काही भागातील प्रेक्षकांचा जो उदंड प्रतिसाद मिळतो त्यावरून या दशावतार नाट्यकांची पाळ-मुळ किती खोलवर मालवणी मुलखातल्या मना-मनात रूजली आहेत. त्याचा प्रत्यय आल्यावाचून रहात नाही. पौराणिक नाटकांमध्ये रात्री दशावतारातील नाटकातला ‘राजा’ वैयक्तिक जीवनात कोण असतो हे त्यालाही माहिती असत. परंतु चेहऱ्याला रंग फासून दशावतार लोककला जीवंत ठेवण्यासाठी स्वत:च्या कुटुंबाची तमा बाळगली नाही असे अनेक लोककलावंत दशावतारातील हिरो आणि व्हीलनचा रोल करणारे कोकणाने पाहिले आहेत. त्यांचा आवाज त्यांची दु:ख कधी सरकारच्या दरबारापर्यंत पोहचली नाहीत. परंतु पावसाळी अधिवेशनात कोकणातील लोककलांचा प्रश्न शिवसेनेचे आमदार निलेश राणे यांनी अत्यंत प्रभावीपणे मांडला. अखंड महाराष्ट्राला कौतुक वाटाव आणि कोकणातील लोककलावंतांना अभिमान वाटावा अशा पद्धतीने मांडणी आ.निलेश राणे यांनी केली. याचा निश्चितपणे चांगला परिणाम झाला. सिंधुदुर्गातील दशावतार, रत्नागिरी जिल्ह्यातील नमन, जाखडी, रायगड जिल्ह्यातील आदिवासी तारफा नृत्य या सर्वांची चर्चा या पावसाळी अधिवेशनात होऊ शकली. आ.निलेश राणे यांनी दशावतार या लोककलेच्या उपेक्षेचे वास्तववादी चित्र विधीमंडळात मांडले. यामुळे महाराष्ट्राचे सांस्कृतिक मंत्री, कोकणचे सुपूत्र ना.आशिष शेलार यांनीही आ.निलेश राणे यांच्या भाषणाची गांभिर्याने दखल घेत लोककलावंतांच्या प्रश्नांमध्ये लक्ष घालत असल्याचे जाहीर केले. लोककलावंत विशेषता दशावतार,नमन , जाखडी कलाकारांना देण्यात येणाऱ्या अनुदानात २.२२ कोटींवरून ४.४० कोटींपर्यंत दुप्पट वाढ केली आहे. , हे अनुदान आता थेट कलाकारांच्या बँक खात्यात जमा होईल असे सांस्कृतिक मंत्र्यांनी जाहीर केले.
मानधन दशावतार कलावंतांसाठी एक समितीही गठीत करण्यात आल्याचे ना.आशिष शेलार यांनी सांगीतले. पश्चिम महाराष्ट्रातील प्रसिद्ध असलेल्या तमाशा या लोककलेला राजाश्रय मिळाला. शासनाच्यावतीने दिले जाणारे पुरस्कारही देण्यात आले. परंतु कोकणातील लोककलावंत कायमच उपेक्षित राहिले. त्यांच्या प्रश्नाला प्रथमच राज्यसरकार समोर मांडला गेला. त्यामुळे कोकणची लोककला चर्चेत आली. कोकणातील लोककलावंत कोणत्या प्रतिकुल परिस्थितीवर मात करत या लोककलेची उपासना करत या लोककलेची उपासना करत आहेत. याविषयीचे वास्तव चित्र महाराष्ट्रासमोर केवळ या विधीमंडळातील चर्चेमुळे येऊ शकले. कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या तिन्ही जिल्ह्यातील लोककला या विविध प्रकारच्या आहेत. या लोककला समाजात जिवंत राहीली पाहिजे. लोककलांचे संवर्धन झाले पाहिजे यासाठी तन, मन, धनाने जे या लोककलेचे पुजारी आहेत त्यांना कराव तेवढ कौतुक आणि मानावे तेवढे आभार कमीच म्हणावे लागतील. असंख्य लोककलाकारांच्या परिश्रमावर आणि त्यागावर कोकणातील लोककला आज जगासमोर अगदी सातासमुद्रापार सादर होत आहे. या लोककलेला राजाश्रय मिळण्यासंदर्भात चर्चा झाली. याचा निश्चितच आनंद आहेच. परंतु या लोककलावंतांना जेव्हा खऱ्याअर्थाने शासनदरबारी न्याय मिळेल तेव्हा कोकणातील लोककलावंतांच्या आयुष्य सुर्य उतारवयाकडे जात असताना त्यांना जर योग्यपद्धतीने आधार मिळाला तर खऱ्याअर्थाने या लोककलावंतांच्या आयुष्यात चार सुखाचे क्षण आले असे म्हणता येईल.












