राजापूर । प्रतिनिधी : महिनाभरापुर्वी तालुक्यात मुसळधार स्वरूपात झालेल्या झालेल्या पावसामुळे आलेल्या पुराच्या पाण्यात अडकलेल्या एका प्रौढाला पुराच्या पाण्यातुन सुखरूप बाहेर काढत जीवदान देणाऱ्या राजापुरातील वैभव गुरव व जगदीश गुरव या बंधूंचा नुकताच जिल्हा पोलीस प्रशासनाच्या वतीने प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला.
जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. नितीन बगाटे व अपर पोलीस अधीक्षक श्री. बी. बी महामुनी यांच्या हस्ते प्रशस्तीपत्रक देऊन या गुरव बंधूंना गौरविण्यात आले.

राजापूर शहरालगत असलेल्या उन्हाळे येथील स्वामी समर्थ मठाजवळील मोरीवर अतिवृष्टीमुळे पाण्याचा प्रचंड प्रवाह सुरू होता. मोरी पूर्णपणे पाण्याखाली गेल्याने या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली होती. अशावेळी फुफेरे येथील जाधव हे दुचाकीवरून राजापूरच्या दिशेने येत असताना त्यांनी पाण्यातून वाहन पुढे नेण्याचा प्रयत्न केला. मात्र, पाण्याचा वेग प्रचंड असल्याने दुचाकीवरील त्यांचा ताबा सुटला आणि ते मोरीतील प्रवाहात अडकले. वाहून जाण्याचा धोका निर्माण झाल्याने त्यांनी जवळील झाडाला धरून जीव वाचविण्यासाठी आराडाओरड केली.
दरम्यान, वैभव गुरव हे आपल्या बंधू जगदीश गुरव यांना मुंबईला जाण्यासाठी रेल्वे स्थानकावर सोडण्याकरिता या मार्गावरून जात होते. यावेळी त्यांना जाधव यांची हाक ऐकू आली व मोरीजवळ पाण्यात अडकलेली दुचाकी दिसली. यावेळी या पुराच्या पाण्यात मध्यभागी झाडाला धरून जाधव उभे असल्याचे त्यांना दिसले. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून दोन्ही बंधूंनी क्षणाचाही विलंब न करता कोणतेही बचाव साहित्य उपलब्ध नसतानाही त्यांनी प्रसंगावधान राखत झाडाच्या वेलीपासून दोर तयार केला. मोठ्या धाडसाने तो जाधव यांच्यापर्यंत पोहोचवून स्वतःचाही जीव धोक्यात घालत त्यांना जाधव यांना सुरक्षितपणे पुराच्या पाण्यातून बाहेर काढले.
गुरव बंधूंच्या या मानवतावादी कार्याची दखल घेत रत्नागिरी जिल्हा पोलीस प्रशासनाने दखल घेत त्यांचा गौरव केला आहे.












