नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांना निवेदन
चिपळूण (प्रतिनिधी) :
शहरातील वाशिष्ठी आणि शिव नदीवरील पूल हे वाहतुकीसाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. परंतु सध्या शहरातील नदीवरील या पुलांची खूपच बिकट अवस्था झाली आहे. गेल्या काही काळापासून या पुलांवरून अनेक अनुचित प्रकार घडत असल्याचे समोर येत आहे. त्यामुळे चिपळूण शहरातील नदीवरील पुलांना सुरक्षेसाठी लोखंडी जाळी बसविण्यात यावी, अशा आशयाचे निवेदन उपनगराध्यक्षा सौ. रूपाली दांडेकर यांनी नुकतेच नगराध्यक्षांना दिले आहे.
या निवेदनातील माहितीनुसार गेल्या काही काळापासून चिपळूण शहरातील नदीवरील या पुलांवरून अनेक अनुचित प्रकार घडत आहेत. अनेक नागरिक पुलावरून जाताना थेट नदीपात्रात प्लास्टिक, घरगुती कचरा आणि निर्माल्य टाकत आहेत, त्यामुळे नदीचे पाणी दूषित होऊन पर्यावरणाचा मोठा व्हास होत आहे. तसेच गेल्या काही दिवसांत पुलावरून नदीत उड्या मारून आत्महत्या करण्याचे तसेच आत्महत्येचा प्रयत्न करण्याचे प्रमाण देखील वाढले आहे. यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा आणि मानवी जीविताचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. या पुलांना संरक्षक कठडे नसल्याने सुरक्षेच्या दृष्टीने ते धोकादायक बनले आहेत. या सर्व गंभीर समस्यांवर कायमस्वरूपी तोडगा म्हणून शहरातील वाशिष्ठी आणि शिव नदीवरील सर्व प्रमुख पुलांच्या दोन्ही बाजूंना पुरेशा उंचीची मजबूत लोखंडी जाळी बसवणे अत्यंत गरजेचे आहे. लोखंडी जाळी बसवल्यामुळे नदीत कचरा टाकण्याला आळा बसेल आणि आत्महत्येसारख्या दुर्दैवी घटनांना प्रतिबंध करणे शक्य होईल, असे या निवेदनात म्हटले आहे.










