वेंगुर्ले वासियांकडून वेंगुर्ला रत्न कै. शिवाजी कुबलांना श्रद्धांजली
वेंगुर्ले : प्रतिनिधी
राजकीय क्षेत्रात शिवाजी दादांचा व माझा कधीही संबंध आला नाही. मी राजकारणात २०१६ साली आलो. मात्र त्या अगोदर आमचे अधिक जवळचे संबंध होते. सचिन वालावलकर व आपण मित्र असल्याने त्यांच्याशी अनेकदा भेटण्याचा, गप्पा मारण्याचा योग आला. दादा हे मिश्किल स्वभावाचे होते. चहा आणि वडा खाताना आमची नेहमी भेट व्हायची. दादांचे राजकारण हे नेहमी सकारात्मक होते. मी पहिल्यांदा नगराध्यक्ष झाल्यानंतर “वेंगुर्ले येथील लोकांनी तुझं नाव काढलं पाहिजे” असं काम कर असं मार्गदर्शन मला त्यांनी केलं होतं. येणाऱ्या कौन्सिलच्या सभेत वेंगुर्ले शहरात दादांचे नाव निरंतर आठवणीत राहण्याच्या दृष्टीने योग्य ठराव करून पुढील साडेचार वर्षात आम्हा लोकप्रतिनिधींच्या हातून चांगली लोकहिताची कामे होतील हीच त्यांना खरी श्रद्धांजली असेल असे उद्गार नगराध्यक्ष दिलीप गिरप यांनी वेंगुर्लेरत्न शिवाजी कुबल यांच्या शोकसभेत काढले.
वेंगुर्लेचे माजी नगराध्यक्ष, वेंगुर्लेरत्न व वेंगुर्लेच्या राजकारणातील भीष्माचार्य शिवाजीदादा कुबल यांचे गुरुवारी २३ जुलै रोजी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांना आदरांजली वाहण्यासाठी आज मंगळवारी नगरपरिषदेच्या स्वामी विववकानंद सभागृहात शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी नगराध्यक्ष दिलीप गिरप, उद्योजक भाई मंत्री, शिवसेना जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर, उपनगराध्यक्ष सुहास गवंडळकर, माजी सभापती जयप्रकाश चमणकर, राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते एम के गावडे, महिला जिल्हाध्यक्ष प्रज्ञा परब, माजी नगराध्यक्ष नम्रता कुबल, नगरसेवक सुषमा प्रभूखानोलकर, दाजी परब, शीतल आंगचेकर, आकांक्षा परब, गौरी मराठे, गौरी माईणकर, रिया केरकर, प्रणव वायंगणकर, प्रीतम सावंत, सुधीर पालयेकर, समिधा रेडकर, लीना म्हापणकर, खर्डेकर महाविद्यालयाचे प्राध्यापक माने, प्रा. नाईक यांच्यासहित विविध क्षेत्रातील व्यक्ती, नागरिक उपस्थित होते.
शिवाजी दादांमुळे माझ्यासारखा सर्वसामान्य कार्यकर्ता आज एवढ्या उंचीवर आहे. माझा आणि दादांचा ३३ वर्षाचा संबंध आहे. त्यांच्या जीवनात अनेक गोष्टी मी पाहिले आहेत. त्यांच्या सुखदुःखात नेहमीच मी त्यांच्याजवळ होतो. राजकारणात कोणत्या व्यक्तीला कुठे बसवायचं हे दादांनी एकदा ठरवलं तर नंतर बदल नाही हे ठाम होते. मंत्रिमंडळात सुद्धा त्यांचे एक वलय होते. दादांच्या कायमस्वरूपी आठवणी या शहरात राहण्यासाठी नगरपालिकेने ठोस निर्णय घ्यावा. त्यांचे स्मारक शहरात होण्यासाठी माझे प्रयत्न असणार आहेत असे शिवाजीदादांच्या अत्यंत जवळचे असलेले सचिन वालावलकर यांनी सांगितले.
शहरातील बंदावस्थेत असलेले सेंड लुक्स हॉस्पिटल पुन्हा सुरू व्हावे अशी दादांची इच्छा होती. सर्वांशी आत्मीयतेने वागावे असा त्यांचा स्वभाव होता. एक उद्योजक म्हणून नेहमीच मला त्यांचे मार्गदर्शन लाभले असल्याचे उद्योजक भाई मंत्री यांनी सांगितले. शिवाजी दादा लोकनियुक्त नगराध्यक्ष होते. त्यावेळी मी उभादंडा सरपंच म्हणून काम करत होतो. सरकारने आंबापेटीवर टॅक्स लावला होता. त्यावेळी आम्ही सर्व सिंधुदुर्ग व रत्नागिरी अंबा बागायतदार एकत्र झालो होतो. त्यावेळी दादांनी जी सरकारकडे आग्रही भूमिका मांडली त्यामुळेच त्यांना हा टॅक्स हटवावा लागला. कोकण कृषी विद्यापीठात आपल्या भागातील मुलांना जास्तीत जास्त प्रवेश मिळावा यासाठी ते नेहमीच आग्रही होते. त्यांच्या शब्दात ताकद होती. बरेच मंत्री त्यांना मानत होते. आंबा,काजू बागायतदार संघटनेच्या वतीने मी त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो असे जयप्रकाश चिमणकर यांनी सांगितले.
१९९१ ते २०१० या कालावधीत मला त्यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली. राजकीय क्षेत्रात पवार साहेबांच्या अत्यंत जवळचे ते व्यक्तिमत्व होते. त्यांच्याबरोबर मुंबई, पुणे व बऱ्याच ठिकाणी आमचा गाडीतून एकत्र प्रवास होत असे. राजकारण काय असतं हे मी त्यांच्याकडून शिकलो. “राजकारणात नाराज व्हायचं असतं, पण ती नाराजी दाखवायची नसते” हे त्यांचे शब्द अजूनही माझ्या आठवणीत आहेत. अशा प्रकारे एम. के. गावडे यांनी दादांच्या आठवणींना उजाळा दिला.
ज्यांच्यामुळे माझ्यासारखी चूल आणि मूल सांभाळणारी एक सामान्य स्त्री नगराध्यक्ष होऊ शकली ते म्हणजे शिवाजीदादा. त्यावेळी शहरात इतर पक्षांबरोबर अभद्र युती होऊन मी राष्ट्रवादीचा नगराध्यक्ष बसले हे फक्त दादांमुळे शक्य झाले. मुंबईत गेल्यानंतर माझी ओळख सून म्हणून त्यांनी सर्वच राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांबरोबर केली होती. सर्व मंत्र्यांच्या केबिनमध्ये दादा तडकपणे जायचे. माझ्या जडणघडणीत दादांचा फार मोठा वाटा आहे. त्यांच्या ओळखींमुळेच आज माझी वरिष्ठांबरोबर ओळख आहे. वेंगुर्लेचे किंगमेकर म्हणून वेंगुर्लेवासीयांनी त्यांना पदवी दिली होती अशाप्रकारे माजी नगराध्यक्ष नम्रता कुबल यांनी त्यांच्या आठवणी सांगितल्या.
शिवाजी दादा हे माझे राजकीय गुरु होते. खरेदी-विक्री संघ संचालक नंतर नगरसेवक मी त्यांच्यामुळेच झालो. अगदी स्वतःची १२ एकर जमीन शेतीसाठी त्यांनी मला दिली होती. जेष्ठ नेते शरद पवारांशी त्यांच्यामुळेच माझी भेट झाली होती. त्यांच्या जाण्याने एक पोकळी निर्माण झाल्याचे नगरसेवक दाजी परब यांनी सांगितले.
यावेळी नगरसेविका सुषमा प्रभूखानोलकर शितल आंगचेकर यांनी सुद्धा दादांबरोबरचे आपले अनुभव शोकसभेत कथन करताना कुबल कुटुंबीयांशी व दादांशी असलेले कौटुंबिक संबंधांना व आठवणींना उजाळा दिला. प्राध्यापक माने यांनी बॅरिस्टर खर्डेकर महाविद्यालय व शिक्षण प्रसारक मंडळ कोल्हापूर यांच्याशी दादांचे असलेले संबंध विशद करताना त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. वेंगुर्ला तालुका पत्रकार समितीच्या वतीने जिल्हा कार्यकारणी सदस्य महेंद्र मातोंडकर यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. या शोकसभेचे सूत्रसंचालन नगरसेवक प्रशांत आपटे यांनी केले.











