▪️निष्काळजीपणा ठरू शकतो जीवावर बेतणारा!
मसुरे | झुंजार पेडणेकर : यावर्षी अलनिनो मुळे खरीप हंगाम चांगलाच लांबला आहे. शेतकरी आजही शेतशिवारात भात लावणी करताना दिसत आहे. लावणी करण्या पूर्वी महत्वाची असते ति नांगरणी. नांगरणीसाठी मात्र बैलांच्या जोताचा वर्षभर येणारा खर्च परवडत नसल्याने पॉवर टिलरचाच आधार शेतकरी घेत आहेत. भरडी जमनीत पॉवर टिलर वापरत नसले तरी पाण्याचा निचरा लवकर ण होणाऱ्या चिखलमय जमनीत पॉवर टिलर वरदान ठरतो. कृषी विभागाकडून सबसीडीवर कर्ज योजना पॉवरटिलर खरेदीसाठी उपलब्ध असल्याने शेतीत सध्या पॉवरटिलरची ‘धडधड’ ऐकू येत आहे. शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणारा पॉवर टिलर नांगरणीसाठी वापरताना योग्य खबरदारी घेतली न गेल्यास मात्र शेतकऱ्यांच्या संपूर्ण कुटुंबाचीच ‘धडधड’ वाढवणारा ठरत आहे. पॉवरटिलरने नांगरणी करताना योग्य खबरदारी न घेतली गेल्याने मसुरे, बांदिवडे, वेरळ परिसरातील काही युवा शेतकऱ्यांना अपंगत्व घेऊन जीवन जगण्याची वेळ आली आहे. त्यामुळे पॉवरटिलर वापरताना योग्य ती खबरदारी घेणे आवश्यक आहे.
कमी वेळ व मजूर, पशुशक्तीला पर्याय म्हणून पॉवरटिलर हे यंत्र शेतकऱ्यांसाठी विकसित करण्यात आले आहे. कोरड्या नांगरणी पासुन अगदी चिखलणीपर्यंत, मशागती व अंतर्गत मशागती, पाण्याचा पंप चालवण्यापासुन ते औषध फवारणीपर्यंत, दळण यंत्रणा, भात भरडणी, ऊसाचे चरक चालवणे ही सर्व कामे या यंत्राद्वारे होतात. पॉवरटिलर सहजरित्या हाताळता येत असल्याने तो न थकता चालवता येतो.
रोटोव्हेटर हे पॉवरटिलरचे मुख्य औजार आहे. याने नांगरट, ढेकळे बारीक करणे, जुन्या पिकांचे अवशेष काढणे, चिखलणी करणे यासाठी रोटोव्हेटरचा वापर केला जातो. याला १२ ते २२ या संख्येत ब्लेड जोडण्याची सोय केलेली असते. फणाच्या आकारानुसार वेगवेगळे उपयोग होतात. यामध्ये अर्ध गोलाकार कुदळी सारखे असणारे फण हे कोरडी नांगरट, तणनियंत्रण, खोली नांगरट यासाठी वापरतात. तर विळ्याच्या आकाराचे फण, तोंडाला वक्रता असणारे चपटे फण चिखलणीसाठी वापरले जातात. याच रोटोव्हेटरची गती वाढवून त्यावर कटरची रचना केली असून याद्वारे जांभा दगड कटींग केला जातो. पॉवरटिलरच्या साह्याने ‘भात कापणी यंत्र विकसित करण्यात आले आहे. रोटोव्हेटरऐवजी खोली नांगरणीसाठी पलटीचा वापर उपयुक्त ठरत असून रोटोव्हेटर यंत्रणा बाजूला करून त्या ऐवजी ट्रॉलीची जोडणी केली जाते. कल्टीव्हेटर ही यंत्रणा फळबाग, वनशेतीमधील मशागतीसाठी उपयुक्त ठरते.
नांगरणीसाठी रोटोव्हेटर वापरताना पुरेशी खबरदारी न घेतल्यास अपघाताची शक्यता असल्याने हे यंत्र योग्यती काळजी घेऊन वापरणे हिताचे आहे. पॉवर टिलर वापरण्या पूर्वी वा यंत्राची संपूर्ण माहिती करुन घ्यावी. प्रत्येक नांगरट किंवा इतर काम झाल्यावर नंतर चेस, गिअरबॉक्स, रोटोव्हेटर यांचे नटबोल्ट घट्ट करून घ्यावेत. नांगरटीचे वेळी खोली नियंत्रीत करणारे चाक जुळवून योग्य खोली नियंत्रीत करावी. गिअरबॉक्स मधील ऑईलची पातळी योग्य ती ठेवावी. व्ही बेल्टचा ताण योग्य ठेवावा. हाताणे मध्य भागी दाबल्यानंतर दोन-चार सें.मी. दाबला जावा इतक्या स्वरुपात घट्ट करावा. यंत्राच्या बाबतीत योग्य काळजी घेतल्यानंतर मुख्य जबाबदारी असते ती हे यंत्र चालवणाऱ्या व्यक्तीने घ्यावयाच्या खबरदारीची. कारण नांगरणीच्या वेळी होणारे अपघात हे पॉवर टिलर चालवणाऱ्याने योग्य खबरदारी न घेतल्यानेच होतात. बांधावरून अथवा घसरत्या रानात चढ उतार करताना रोटोव्हेटर बंद करूनच वापर करावा. पायाने चालत चालविण्याचे यंत्र असल्याने या यंत्राची गती वाढविण्याचा प्रयत्न करणे म्हणजे धोक्यास निमंत्रण देणे होय. रोटोव्हेटर मधील गवत, कचरा, पिकांचे राहिलेले अवशेष काढताना पॉवर टिलरचे इंजिन पूर्णपणे बंद करणेच हिताचे ठरेल.
कारण होणारे अपघात हे अशाप्रकारे गवत काढताना होत असल्याचे निदर्शनास येत आहे. पॉवरटिलर चालू स्थितीत ठेवून फाळात अडकलेले गवत पायाने काढण्याची मानसिकता सदर यंत्र चालविणाऱ्यांमध्ये असल्याने अचानक गिअर वैगर स्लिप झाल्यास नांगराच्या फाळामध्ये पायापासून छातीपर्यंतचा भाग अडकण्याच्या घटना घडत आहेत. तसेच या फणाला वेगवेगळी धार आलेली असल्याने या फणाच्या मध्ये पॅन्ट, साडी अडकू नये याची खबरदारी घ्यावी. इंजिन चालू असताना फाळातील माती अथवा रान काढण्याचा प्रयत्न केल्यास इंजिनच्या धक्याने क्लच निघून पॉवर टिलर सुरु होतो व अपघाताला आमंत्रण मिळू शकते. नांगरणी करताना होणारे बहुतांशी अपघात हे रोटोव्हेटर मध्ये पाय अथवा हात अडकूनच होतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी स्वतःसाठी नाहीतर आपल्या कुटुंबासाठी नांगरणी करताना योग्यती खबरदारी घेणे आवश्यक आहे. मनुष्य बळाची कमतरता व पशुशक्तीला पर्याय म्हणून अनेक युवा शेतकरी पॉवर टिलरचा वापर करत आहेत. त्यातुनच स्वतःच्या शेतीत नांगरणी पूर्ण झाल्यानंतर तासाच्या दराने इतरांची नांगरणी केली जात आहे. चालू हंगामात तासाला साधारण 600 रुपये घेऊन ही नांगरणी केली जात आहे. यातून चार पैसे मिळत असून बँकेचे कर्ज असल्यास हप्त्याची रक्कम सुद्धा निघत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी निदान स्वतःच्या कुटुंबाचा तरी विचार करून योग्य काळजी व योग्य प्रकारे खबरदारी घेऊन पॉवर टिलरचा वापर केल्यास पॉवरटिलर यंत्र नक्कीच अधिक उत्पादनाचा, फायद्याचा मंत्र ठरणार आहे.













