दापोलीतील पाच लोकहिताच्या प्रश्नांसाठी आंदोलनाचा इशारा; प्रशासनाला निवेदन सादर
दापोली(प्रतिनिधी):
दापोली तालुक्यातील प्रलंबित व लोकहिताच्या विविध प्रश्नांवर तातडीने निर्णय घेण्याच्या मागणीसाठी पंचायत समिती सदस्य तथा भाजपाचे उत्तर रत्नागिरी जिल्हा उपाध्यक्ष श्रीराम (भाऊ) इदाते यांनी येत्या १५ ऑगस्ट २०२६ रोजी दापोली तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. यासंदर्भातील निवेदन त्यांनी जिल्हाधिकारी यांना सादर केले असून, अनेक महिन्यांपासून सातत्याने पाठपुरावा करूनही प्रश्न मार्गी लागत नसल्याने हा निर्णय घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
निवेदनात त्यांनी दापोली तालुक्याशी संबंधित पाच महत्त्वाच्या प्रश्नांकडे प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. यामध्ये दापोली एस.टी. आगारासाठी मंजूर झालेल्या १६ बसांपैकी केवळ पाचच बस उपलब्ध असल्याने ग्रामीण भागातील प्रवाशांची होणारी गैरसोय, राज्य मार्ग क्रमांक १७ च्या कामादरम्यान पालगड नळपाणी योजनेचे झालेले नुकसान व त्याची दुरुस्ती, किनारपट्टी भागातील रस्त्यांच्या दुरुस्तीतील विलंब, पंतप्रधान आवास योजनेतील लाभार्थ्यांना मोफत वाळू उपलब्ध करून देण्याची मागणी, तसेच दापोली तालुक्यात सुरू असलेल्या जंगलतोडीची चौकशी करून नव्याने वृक्षलागवड करण्याची मागणी या प्रमुख विषयांचा समावेश आहे.
इदाते यांनी निवेदनात नमूद केले आहे की, हे सर्व प्रश्न सर्वसामान्य नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी निगडित असून, संबंधित विभागांनी तातडीने कार्यवाही करणे आवश्यक आहे. प्रशासनाने योग्य तो निर्णय घेतला नाही, तर येत्या स्वातंत्र्य दिनी दिनांक १५ ऑगस्टपासून दापोली तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू करण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला आहे.
या निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री, संबंधित मंत्री, कोकण आयुक्त, जिल्हा परिषद, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण तसेच विविध विभागांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही पाठविण्यात आल्या असून, या आंदोलनाकडे आता प्रशासन कोणती भूमिका घेते याकडे दापोली तालुक्याचे लक्ष लागले आहे.











