‘निसर्गरम्य चिपळूण आणि संगमेश्वर रेल्वे’ ग्रुपच्या मागणीला आणि आ. शेखर निकम यांच्या पाठपुराव्यालाही यश
देवरूख (प्रतिनिधी) : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांसह कडवई परिसरातील रेल्वे प्रवाशांसाठी मोठी दिलासादायक बातमी आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस–रत्नागिरी गणपती स्पेशल गाडी क्रमांक ०११५३/०११५४ ला कडवई रेल्वे स्थानकावर थांबा मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे कडवई तसेच परिसरातील प्रवाशांना गणेशोत्सवाच्या काळात मुंबईहून कोकणात ये-जा करण्यासाठी मोठी सुविधा उपलब्ध होणार आहे.
कडवई रेल्वे स्थानकावर गणपती स्पेशल गाडीला थांबा मिळावा, यासाठी ‘निसर्गरम्य चिपळूण आणि संगमेश्वर रेल्वे’ फेसबुक ग्रुपचे प्रमुख संदेश जिमन यांनी कोकण रेल्वेकडे निवेदन सादर करून मागणी केली होती. गणेशोत्सवाच्या काळात दरवर्षी मुंबई आणि इतर शहरांमधून मोठ्या संख्येने चाकरमानी कोकणात येतात. या पार्श्वभूमीवर कडवई स्थानकावर गणपती स्पेशलला थांबा मिळाल्यास कडवईसह संगमेश्वर तालुक्यातील प्रवाशांना त्याचा मोठा फायदा होईल, अशी मागणी करण्यात आली होती.
या मागणीसाठी सातत्याने करण्यात आलेल्या पाठपुराव्याला अखेर यश आले आहे. या मागणीला पाठिंबा देत आमदार शेखर निकम यांनीही कडवई रेल्वे स्थानकावर गणपती स्पेशलला थांबा देण्यात यावा, यासाठी कोकण रेल्वेकडे पत्राद्वारे मागणी केली होती. त्यामुळे नागरिकांच्या मागणीसोबतच लोकप्रतिनिधींच्या पाठपुराव्यालाही यश मिळाले आहे.
कडवई रेल्वे स्थानकावर गणपती स्पेशलला थांबा मंजूर झाल्यामुळे कडवई परिसरातील नागरिक, संगमेश्वर तालुक्यातील प्रवासी तसेच कोकणात गणेशोत्सवासाठी येणाऱ्या चाकरमान्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. नागरिकांच्या मागणीला लोकप्रतिनिधींची साथ आणि सातत्यपूर्ण पाठपुरावा यामुळे हा थांबा मंजूर झाल्याने परिसरातून समाधान व्यक्त होत आहे. या महत्त्वपूर्ण पाठपुराव्यासाठी आमदार शेखर निकम यांचे संदेश जिमन यांनी आभार मानले आहेत.













