भंडारी कनिष्ठ महाविद्यालयाचा सीमेवरील सैनिकांसाठी ‘राखीबंध’!

सैनिकांना विद्यार्थिनींकडून २५ हजार राख्या

सलग दहा वर्षे आदर्शवत व प्रेरणादाई उपक्रम

मालवण | प्रतिनिधी :
‘एक राखी सैनिकांसाठी, सीमेवरच्या भावांसाठी’ हा भावनिक संदेश देत मालवण येथील भंडारी एज्युकेशन सोसायटीच्या कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थिनींनी देशाच्या सीमेवर तैनात जवानांसाठी तब्बल २५ हजार राख्या तयार करून पोस्टाद्वारे पाठविल्या. सैनिकांप्रति प्रेम, आदर आणि कृतज्ञता व्यक्त करणारा हा उपक्रम महाविद्यालयातर्फे सलग दहाव्या वर्षी राबविण्यात आला.

भंडारी ए. सो. हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या सभागृहात राखी पाठविण्याचा कार्यक्रम उत्साहात झाला. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून तसेच सरस्वती माता, भारतमाता आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.

यावेळी मालवण तहसीलदार गणेश लव्हे, गटविकास अधिकारी परागिनी पाटील, सेवानिवृत्त सैनिक पी. टी. परब व विष्णू ताम्हाणेकर, पोस्ट मास्तर देसाई, डेप्युटी पोस्ट मास्तर पुलसुंगे, संस्थेच्या कौन्सिल ऑफ मॅनेजमेंटचे सदस्य रामदास मयेकर, प्राचार्य आर. डी. बनसोडे, ग्रंथपाल प्रफुल्ल देसाई, प्रा. पवन बांदेकर यांच्यासह शिक्षक, विद्यार्थी, विद्यार्थिनी, पालक व माजी विद्यार्थी उपस्थित होते.

प्रा. पवन बांदेकर यांनी प्रास्ताविक केले. सर्वाधिक राख्या तयार करणाऱ्या विद्यार्थिनींमध्ये तनिष्का केळूसकर हिने प्रथम, रुची कांबळी हिने द्वितीय, तर लक्ष्मी दरगुडे हिने तृतीय क्रमांक मिळविला. या विद्यार्थिनींना मान्यवरांच्या हस्ते पैठणी साडी व पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. शौर्या कांबळी, दिया गोलतकर आणि हर्षिता तारी यांनी मनोगते व्यक्त केली.

तहसीलदार गणेश लव्हे यांनी सैनिक खडतर व अनिश्चित परिस्थितीत देशाचे रक्षण करीत असल्याचे सांगत त्यांच्याप्रति प्रेम व आदर व्यक्त करणारा हा उपक्रम स्तुत्य असल्याचे नमूद केले. विद्यार्थ्यांनी सैनिकांचा आदर्श घेत चांगले नागरिक बनून देशसेवेत योगदान द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.

गटविकास अधिकारी परागिनी पाटील यांनीही सैनिकांप्रती आदर व्यक्त केला. तसेच सैनिकांना राखीच्या माध्यमातून मिळणारे प्रेम आणि आपुलकी त्यांच्यासाठी निश्चितच आनंददायी ठरेलं. असेही त्यांनी सांगितले.

सेवानिवृत्त सैनिक पी. टी. परब यांनी विद्यार्थिनींनी पाठविलेल्या राख्यांमधील प्रेम सैनिकांपर्यंत पोहोचताना अधिक बळकट होईल, असे सांगत मालवणच्या विद्यार्थ्यांमधूनही उद्याचे सैनिक घडावेत, अशी अपेक्षा व्यक्त केली. विष्णू ताम्हाणेकर यांनी युवकांनी छोट्या-छोट्या कृतींतून देशसेवा करत राहण्याचे आवाहन केले.

यावेळी प्राचार्य आर. डी. बनसोडे व रामदास मयेकर यांनीही विचार मांडले. सूत्रसंचालन प्राजक्ता परब-पवार यांनी केले, तर आभार श्री. गोसावी यांनी मानले.