वनविभाग व ग्रामस्थांच्या तत्परतेने नैसर्गिक अधिवासात मुक्त
आंबोली :
आंबोली बंगलेवाडी परिसरात भटक्या कुत्र्यांनी एका सांबर हरणाच्या पिल्लाचा पाठलाग सुरू केल्याची माहिती मिळताच वनविभाग आणि स्थानिक ग्रामस्थांच्या तत्परतेमुळे या पिल्लाला सुखरूप जीवदान मिळाले आहे. घटनेचे गांभीर्य ओळखून वनपरिक्षेत्र अधिकारी वैभव भिसे यांच्या मार्गदर्शनाखाली वनविभागाची आरआरटी (रॅपिड रिस्पॉन्स टीम) तात्काळ घटनास्थळी दाखल झाली आणि त्यांनी कुत्र्यांच्या तावडीतून पिल्लाची यशस्वी सुटका केली.
बचावकार्यानंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत हरणाच्या पिल्लाची प्राथमिक आरोग्य तपासणी करण्यात आली. पिल्लू पूर्णपणे सुरक्षित आणि सुस्थितीत असल्याचे निश्चित झाल्यावर वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सल्ल्यानुसार त्याला पुन्हा त्याच्या नैसर्गिक अधिवासात सुखरूप मुक्त करण्यात आले. वनविभागाची जलद कारवाई आणि ग्रामस्थांच्या ऐनवेळी मिळालेल्या सहकार्यामुळे एका वन्यजीवाचा प्राण वाचल्याने सर्वत्र कौतुक होत आहे.
या संपूर्ण रेस्क्यू मोहिमेत आंबोलीचे वनपाल सम्राट पाटील, वनरक्षक अनिकेत आवारे, अनिकेत देशमुख आणि वनमजूर मंगेश सावंत यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. तसेच आरआरटी रेस्क्यू टीमचे सदस्य प्रथमेश गावडे, दीपक नाटलेकर, प्रथमेश प्रदीप गावडे, श्रीकृष्ण गवस, सुरेश कोकरे व वसंत गावडे यांनी विशेष मेहनत घेतली. या मोहिमेत स्थानिक ग्रामस्थ विशाल सावंत, कृष्णा गावडे, करण गावडे, किशोर गावडे, कुणाल गावडे, अक्षय गावडे, दादा नाटलेकर आणि आशिष गावडे यांनी मोलाचे सहकार्य देऊन वन्यजीव संरक्षणाचा आदर्श वस्तुपाठ घालून दिला.












