मुंबई-गोवा महामार्गावरील सावर्डे येथे धोकादायक खड्ड्याची अखेर संपूर्ण दुरुस्ती

चिपळूण (प्रतिनिधी) : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ वरील चिपळूण तालुक्यातील सावर्डे येथील आरती स्वीटसमोरील धोकादायक खड्डा वाहनचालकांसाठी डोकेदुखी ठरत होता. वारंवार खडी, डांबर व काँक्रीट टाकून तात्पुरती दुरुस्ती करण्यात येत असली तरी काही दिवसांतच खड्डा पुन्हा पूर्ववत होत असल्याने नागरिक, प्रवासी व वाहनचालकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले होते. अखेर सावर्डे येथील तो धोकादायक खड्डा केवळ भरण्याऐवजी संपूर्ण खराब झालेला भाग खोदून नव्याने काँक्रीट पॅच टाकण्यात आले आहे.
याबाबत वारंवार मीडियाने, स्थानिक लोकप्रतिनिधी यांनी आवाज उठवून संबंधित यंत्रणेला जाग आणली, सदर मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असून पावसाळ्यात खड्ड्यात पाणी साचल्याने त्याची खोली लक्षात येत नव्हती. त्यामुळे दुचाकीस्वारांना अपघाताचा धोका निर्माण होत होता. अनेकवेळा स्थानिक नागरिक, सामाजिक कार्यकर्ते तसेच प्रवाशांनी संबंधित विभागाकडे तक्रारी करून कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी केली होती. अखेर संबंधित यंत्रणेने या समस्येची दखल घेत खड्डा केवळ भरण्याऐवजी संपूर्ण खराब झालेला भाग खोदून नव्याने काँक्रीट पॅच टाकण्याचे काम हाती घेतले आहे. यासाठी काहीकाळ वाहतुकीत बदल करून, महामार्गावरील वाहतूक एकेरी करून दुरुस्तीचे काम सुरू करून झालेल्या तसदीबद्दल दिलगिरी व्यक्त केली आहे. त्यामुळे भविष्यात हा भाग अधिक मजबूत होऊन वारंवार खड्डे पडण्याची समस्या कमी होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. दरम्यान, स्थानिक नागरिकांनी या ठिकाणी कायमस्वरूपी आणि दर्जेदार दुरुस्ती करण्याबरोबरच महामार्गावरील इतर धोकादायक भागांचीही तातडीने पाहणी करून आवश्यक उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.