निकृष्ट दर्जाच्या रस्ते व पूलाच्या कामाविरोधात उद्या उपोषणाचा इशारा

शिवसेना युवा प्रमुख प्रशांत जाधव यांचा तहसीलदारांना इशारा

बांदा : प्रतिनिधी 

शेर्ले परिसरातील रस्ते व पुलाची कामे अत्यंत निकृष्ट दर्जाची झाली असून यामुळे ग्रामस्थांची मोठी गैरसोय होत आहे. या कामांची क्वालिटी कंट्रोलद्वारे चौकशी करून दोषींवर कारवाई करावी. अन्यथा स्वातंत्र्य तहसीलदार कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करण्याचा इशारा सावंतवाडी तालुका मागासवर्गीय सेल युवा प्रमुख प्रशांत जाधव यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.

 

निवेदनात म्हटले आहे की, शेर्ले सॉ मिल ते नदीपर्यंतचा रस्ता आणि शेर्ले-कापईवाडी ते सॉ मिल रस्ता या दोन्ही रस्त्यांची कामे निकृष्ट झालेली आहेत. रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून सोल्डरपट्टीचे काम योग्य प्रकारे केलेले नाही.

 

ऐतिहासिक कापई पुलाचे कामही निकृष्ट झाले असून पुलाला संरक्षक भिंत बांधण्यात आलेली नाही. त्यामुळे येथे गंभीर अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. रस्त्यावर कामाचा नामफलक लावलेला नाही. गटारांची योग्य जागी निर्मिती झालेली नाही. तसेच एसटी परतण्यासाठी आवश्यक प्लॅटफॉर्म बांधण्यात आलेला नाही.

 

या सर्व गंभीर बाबींची तत्काळ दखल घेऊन क्वालिटी कंट्रोल मार्फत चौकशी करावी आणि संबंधित ठेकेदार व अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. प्रशासनाने कार्यवाही न केल्यास स्वातंत्र्यदिनी बेमुदत उपोषणावर बसण्याचा निर्धार प्रशांत जाधव यांनी व्यक्त केला आहे.