सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासाला गती; १,५०९ शेतकऱ्यांना ७.७७ कोटींची कर्जमाफी
पर्यटन, मत्स्य व्यवसाय, आरोग्य, शिक्षण आणि रोजगारासाठी विविध योजनांना चालना; युवकांनी AI आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा, पालकमंत्री नितेश राणे यांचे आवाहन
सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्गनगरी येथे स्वातंत्र्य दिनाचा मुख्य ध्वजारोहण सोहळा पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते उत्साहात पार पडला. यावेळी आमदार दीपक केसरकर, आमदार निलेश राणे, जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर, पोलिस अधीक्षक मोहन दहिकर, भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अबीद नाईक, माजी आमदार राजन तेली, उपाध्यक्ष दादा साईल, प्रितेश राऊळ, संतोष साठविलकर, काका कुडाळकर, ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक दीपलक्ष्मी पडते यांच्यासह नागरिक, विद्यार्थी, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने कृषी, पोलिस विभाग, शिक्षण, क्रीडा, युवा, वैद्यकीय क्षेत्र यांसह विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी व योगदान देणाऱ्या व्यक्तींचा पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी जिल्ह्यातील १२५ क्षयरोग रुग्णांना दत्तक घेण्याचा उपक्रमही करण्यात आला.
जिल्हावासीयांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देताना पालकमंत्र्यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुरू असलेल्या विविध विकास योजनांचा आढावा घेतला. शेतकरी कर्जमाफी, पर्यटन, मत्स्य व्यवसाय, गृहनिर्माण, आरोग्य, शिक्षण, सागरी सुरक्षा आणि रोजगारनिर्मिती या क्षेत्रांत शासनामार्फत महत्त्वपूर्ण उपक्रम राबविले जात असल्याचे त्यांनी सांगितले.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना २०२६ अंतर्गत जिल्ह्यातील १,५०९ शेतकऱ्यांना ७.७७ कोटी रुपयांची कर्जमाफी मिळाली आहे. तसेच सिंधुरत्न समृद्धी योजना २.० अंतर्गत पर्यटन आणि मत्स्य उद्योगासाठी २०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. चिपी-नवी मुंबई विमानसेवा लवकरच सुरू होणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.
प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत १५,०९७ घरांना मंजुरी, मेगा आरोग्य शिबिरे, ७१६ हक्क अभिलेखांचे वितरण, सागरी सुरक्षेसाठी कोस्टल कॅबिनची उभारणी, अपघातमुक्त सिंधुदुर्ग अभियान तसेच युवकांसाठी रोजगाराच्या नव्या संधी अशा विविध उपक्रमांमुळे जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाला गती मिळत असल्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी नमूद केले.
युवकांनी आधुनिक तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्तेचा प्रभावी वापर करून प्रगती साधावी आणि विकसित भारताच्या निर्मितीत योगदान द्यावे, असे आवाहनही त्यांनी केले.













