मालवण केंद्रस्तरीय समूहगीत गायन, निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न 

स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून स्पर्धेचे आयोजन 

देशभक्तीपर गीत गायन टोपीवाला प्राथमिक शाळा प्रथम

निबंध स्पर्धेत टोपीवाला हायस्कूलची रुही गणेश मयेकर अव्वल 

मालवण | प्रतिनिधी : ‘हर घर तिरंगा’ अभियान आणि स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून मालवण केंद्रस्तरीय देशभक्तीपर समूहगीत गायन व निबंध स्पर्धेचे आयोजन तालुका स्कूल, मालवण येथे करण्यात आले. देशभक्तीपर गीत गायन टोपीवाला प्राथमिक शाळा प्रथम क्रमांक तर निबंध स्पर्धेत टोपीवाला हायस्कूलची रुही गणेश मयेकर प्रथम क्रमांकाची मानकरी ठरली.

 

 

विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतांमधून राष्ट्रप्रेमाची भावना व्यक्त केली, तर निबंध स्पर्धेत आपल्या लेखणीतून स्वातंत्र्य दिनाचे महत्त्व अधोरेखित केले.

 

स्पर्धेचे उद्घाटन मालवण गटशिक्षणाधिकारी अजिंक्य कोतमिरे, संजय माने, प्रशांत पारकर, केंद्रप्रमुख गुरुनाथ ताम्हणकर, परीक्षक ऋत्तावरी वळंजू, कविता खानोलकर तसेच केंद्रातील शिक्षकांच्या उपस्थितीत झाले.

 

देशभक्तीपर समूहगीत गायन स्पर्धेत इयत्ता पहिली ते पाचवी गटातून एकूण आठ शाळांनी सहभाग घेतला. यात एम. एम. परुळेकर टोपीवाला प्राथमिक शाळेने प्रथम, टोपीवाला हायस्कूल, मालवणने द्वितीय, तर भंडारी प्राथमिक शाळेने तृतीय क्रमांक पटकावला.

देऊळवाडा मालवण, रोझरी इंग्लिश, मालवण दांडी, रेवतळे मालवण आणि धुरीवाडा मालवण या शाळांना उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आले.

 

निबंध स्पर्धेत इयत्ता पाचवी ते सातवी गटातून एकूण २० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. रुही गणेश मयेकर (टोपीवाला हायस्कूल) हिने प्रथम क्रमांक मिळविला. श्रेया लक्ष्मण शिंदे (भंडारी हायस्कूल) आणि नेहा राजन कामत (टोपीवाला हायस्कूल) यांनी संयुक्तपणे द्वितीय क्रमांक पटकावला. शुभ्रा सिताराम हडकर (रोझरी इंग्लिश) आणि रेणुका गुरुनाथ चव्हाण (भंडारी हायस्कूल) यांनी तृतीय क्रमांक मिळविला. परी रुपेश धुरी (मालवण दांडी) आणि हर्षाली अमोल चव्हाण (जय गणेश इंग्लिश मीडियम) यांना उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आले.

स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थी व सहभागी शाळांचा प्रमाणपत्रे व भेटवस्तू देऊन गौरव करण्यात आला. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये देशभक्ती, राष्ट्रप्रेम तसेच सर्जनशील लेखनाची आवड निर्माण होण्यास प्रोत्साहन मिळाले.