सर्पांविषयी वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करण्याचे सर्पमित्र महेश राऊळ यांचे आवाहन

खर्डेकर महाविद्यालयात ‘सर्प : समज, गैरसमज आणि संवर्धन’ विषयावर कार्यशाळा संपन्न..

वेंगुर्ले : प्रतिनिधी

सापांविषयी समाजात असलेली भीती, गैरसमज आणि अंधश्रद्धा दूर करून विद्यार्थ्यांमध्ये सर्पांविषयी वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करणे, तसेच सर्पांचे पर्यावरणातील महत्त्व आणि संवर्धनाची गरज याबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने शिक्षण प्रसारक मंडळ, कोल्हापूर संचलित बॅ. बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालय, वेंगुर्ला येथे प्राणिशास्त्र विभाग, क्रीडा विभाग आणि रोटरी क्लब ऑफ वेंगुर्ला मिडटाउन यांच्या संयुक्त विद्यमाने ‘सर्प : समज, गैरसमज आणि संवर्धन’ या विषयावर विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.

सदर कार्यशाळेत सर्पांच्या विविध प्रजाती, त्यांचे अधिवास, पर्यावरणीय महत्त्व, विषारी व बिनविषारी सापांमधील फरक, सर्पदंशाच्या प्रसंगी घ्यावयाची काळजी तसेच सर्पांविषयी समाजात प्रचलित असलेले गैरसमज याबाबत विद्यार्थ्यांना सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.

कार्यक्रमाची सुरुवात महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. डी. बी. गोस्वामी यांच्या हस्ते सर्व मान्यवरांच्या स्वागताने झाली. प्राणिशास्त्र विभागप्रमुख डॉ. वसंतराव पाटोळे यांनी प्रास्ताविकातून कार्यशाळेचा उद्देश स्पष्ट केला. वाणिज्य विभागाचे डॉ. सचिन परुळकर यांनी उपस्थित मान्यवरांचा परिचय करून दिला. महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. डी. बी.गोस्वामी यांनी अध्यक्षस्थान भूषविले.

अध्यक्षीय भाषणात प्राचार्य प्रा. डॉ. गोस्वामी यांनी सर्पांविषयी विद्यार्थ्यांनी वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारण्याची गरज व्यक्त केली. ते म्हणाले की, साप हा पर्यावरणातील महत्त्वाचा घटक असून जैवविविधता आणि पर्यावरणाचा समतोल राखण्यात त्याची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. सापांविषयी असलेल्या गैरसमजांमुळे अनेकदा निरुपद्रवी सापांचाही जीव धोक्यात येतो. त्यामुळे विद्यार्थ्यांनी सापांविषयी शास्त्रीय माहिती आत्मसात करून ती समाजापर्यंत पोहोचविणे आवश्यक आहे.

साप दिसल्यानंतर भीतीपोटी त्याला मारण्याऐवजी प्रशिक्षित सर्पमित्रांची मदत घेणे गरजेचे असल्याचेही प्राचार्य गोसावी यांनी सांगितले. महाविद्यालयात अशा प्रकारच्या जनजागृतीपर उपक्रमांचे आयोजन केल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संवर्धनाची जाणीव निर्माण होते. सर्पसंवर्धनासोबतच निसर्गातील प्रत्येक जीवाचे महत्त्व विद्यार्थ्यांनी समजून घेतले पाहिजे, असे त्यांनी नमूद केले.

कार्यशाळेचे प्रमुख व्याख्याते सर्पमित्र व समाजसेवक महेश राऊळ यांनी विद्यार्थ्यांना सापांविषयी अत्यंत उपयुक्त आणि शास्त्रीय माहिती दिली. ते म्हणाले, “साप हा माणसाचा शत्रू नसून निसर्गाच्या अन्नसाखळीतील अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. उंदीर, घुशी यांसारख्या प्राण्यांची संख्या नियंत्रित ठेवण्यात सापांची महत्त्वाची भूमिका असते. त्यामुळे सापांचे अस्तित्व पर्यावरणीय समतोलासाठी अत्यावश्यक आहे.”

साप दिसला की त्याला मारणे हा उपाय नसून अज्ञानाचा परिणाम असल्याचे सांगून राऊळ म्हणाले, “सापाला न मारता सुरक्षितपणे त्याची सुटका करणे हीच खरी निसर्गसेवा आहे. भीतीपेक्षा माहिती महत्त्वाची आहे. सापांविषयी योग्य वैज्ञानिक माहिती मिळाली तर अनेक गैरसमज आपोआप दूर होतील.”

सापांविषयी समाजात अनेक वर्षांपासून प्रचलित असलेल्या अंधश्रद्धांवरही त्यांनी प्रकाश टाकला. साप दूध पितो, साप सूड घेतो, सापाच्या डोक्यावर नागमणी असते, सापाला मारल्यानंतर त्याचा जोडीदार बदला घेतो, अशा विविध समजुतींचा उल्लेख करून त्यामागे कोणतेही वैज्ञानिक तथ्य नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी त्यांनी विषारी व बिनविषारी सापांची ओळख, त्यांचे नैसर्गिक वर्तन, अधिवास आणि पर्यावरणातील भूमिका याबाबत विद्यार्थ्यांना माहिती दिली. “साप माणसावर हल्ला करण्यासाठी शोधत फिरत नाही. बहुतांश वेळा तो माणसापासून दूर जाण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे साप दिसल्यास त्याला चिथावू नये, पकडण्याचा किंवा मारण्याचा प्रयत्न करू नये आणि सुरक्षित अंतर ठेवून प्रशिक्षित सर्पमित्राची मदत घ्यावी,” असे आवाहन त्यांनी केले.

सर्पदंशाच्या प्रसंगी तातडीने वैद्यकीय उपचार घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे, यावरही महेश राऊळ यांनी विशेष भर दिला. सर्पदंश झालेल्या व्यक्तीला झाडफुंक, मंत्र-तंत्र किंवा घरगुती उपचारांमध्ये वेळ न घालवता शक्य तितक्या लवकर रुग्णालयात दाखल करावे. चुकीचे उपचार, जखम कापणे किंवा विष शोषण्याचा प्रयत्न करणे यांसारख्या धोकादायक पद्धती टाळाव्यात, असे त्यांनी स्पष्ट केले.

सर्पसंवर्धनाबाबत बोलताना राऊळ म्हणाले, “सर्पसंवर्धन म्हणजे केवळ सापांचे संरक्षण नव्हे, तर संपूर्ण पर्यावरणाचे संरक्षण आहे.” जंगलतोड, वाढते नागरीकरण, रस्ते अपघात आणि अज्ञानामुळे सापांच्या अधिवासावर परिणाम होत असून जैवविविधतेचे संरक्षण करण्यासाठी प्रत्येक जीवाचे महत्त्व समजून घेणे आवश्यक आहे, असे त्यांनी सांगितले.

सर्पमित्र म्हणून काम करताना आलेल्या अनुभवांचा संदर्भ देत त्यांनी सांगितले की, अनेकदा नागरिक भीतीपोटी सापाला मारण्याचा निर्णय घेतात. मात्र योग्य माहिती आणि मार्गदर्शन मिळाल्यानंतर तेच नागरिक सापाला वाचविण्यासाठी पुढाकार घेतात. “एका सापाचा जीव वाचविणे म्हणजे केवळ एका जीवाचे संरक्षण नाही, तर पर्यावरणाच्या एका महत्त्वाच्या दुव्याचे रक्षण करणे आहे,” असा भावनिक संदेश त्यांनी दिला.

या कार्यशाळेसाठी शिक्षण प्रसारक मंडळाचे सन्माननीय सचिव श्री. प्रा. जयकुमारजी देसाई साहेब, चेअरमन सौ. मंजिरी देसाई मोरे मॅडम तसेच पेट्रन कौन्सिल मेंबर दौलतराव तथा बाळासाहेब देसाई यांनी शुभेच्छा दिल्या.

रोटरी इंटरनॅशनलच्या सात महत्त्वपूर्ण कार्यक्षेत्रांपैकी पर्यावरण संरक्षण हे एक महत्त्वाचे कार्यक्षेत्र असून, या कार्यासाठी रोटरी क्लब ऑफ वेंगुर्ला मिडटाउन सातत्याने कार्यरत आहे. याचाच एक भाग म्हणून या कार्यशाळेसाठी रोटरी क्लबने पुढाकार घेतला. क्लबचे अध्यक्ष रो. प्रथमेश नाईक, सचिव रो. मुकुल सातार्डेकर, खजिनदार रो. उदय दाभोलकर, तसेच रो. राजन उर्फ दिलीप गिरप आणि डिस्ट्रिक्ट सेक्रेटरी ऑफ पोलिओ रो. राजेश घाटवळ हे सातत्याने विविध सामाजिक व पर्यावरणपूरक उपक्रमांसाठी पुढाकार घेत मार्गदर्शन व सहकार्य करत असतात.

 

कार्यशाळेला अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक श्री. एस. एच. माने, स्टाफ सेक्रेटरी डॉ. एस. जी. चुकेवाड, रो. दादा साळगावकर, रोटरी क्लब ऑफ वेंगुर्ला मिडटाउनचे अध्यक्ष रो. प्रथमेश नाईक, सचिव रो. मुकुल सातार्डेकर आणि ट्रेझरर रो. विष्णू दाभोलकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

 

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वनस्पतीशास्त्र विभागाच्या सहाय्यक प्राध्यापक डॉ. धनश्री पाटील यांनी केले, तर क्रीडा संचालक प्रा. जे. वाय. नाईक यांनी आभार मानून कार्यक्रमाचा समारोप केला.