चुनवरे गावचे सुपुत्र अनिल परब यांना राष्ट्रपती शौर्यपदक जाहीर !

▪️चेंबूरमधील ५८२ मोनोरेल प्रवाशांची ४०-५० फूट उंचीवरून सुखरूप सुटका केल्याबद्दल गृहमंत्रालयाकडून बहुमान

मसुरे | झुंजार पेडणेकर : मालवण तालुक्यातील चुनवरे गावचे सुपुत्र व मुंबई अग्निशमन दलातील उपमुख्य अग्निशमन अधिकारी अनिल वसंत परब यांना राष्ट्रपती शौर्य पदक (अग्निशमन सेवा) जाहीर झाले आहे. स्वातंत्र्य दिनानिमित्त केंद्रीय गृहमंत्रालयाकडून महाराष्ट्रातील पोलीस, कारागृह, अग्निशामक आणि होमगार्ड दलातील अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांना घोषित झालेल्या प्रमुख राष्ट्रपती व सेवा पदकांची घोषणा 14 ऑगस्टला झाली होती.

श्री. अनिल वसंत परब यांना अग्निशमन दलात तब्बल ३० वर्षांपेक्षा जास्त सेवेचा दीर्घ आणि यशस्वी अनुभव आहे.

मुंबईतील भीषण आग, उंच इमारतींमधील आपत्कालीन सुटका मोहिमा, इमारत कोसळण्याच्या दुर्घटना तसेच नैसर्गिक व मानवनिर्मित आपत्तींच्या वेळी त्यांनी दाखवलेल्या अत्यंत धाडसी, अतुलनीय आणि नेतृत्वाच्या कौशल्याबद्दल त्यांना हे शौर्य पदक प्रदान करण्यात आले आहे.

यापूर्वी त्यांना २०२६ च्या सुरुवातीला राष्ट्रपतींचे गुणवत्तापूर्ण सेवा पदक देखील प्राप्त झाले आहे.

मुंबई अग्निशमन दलाच्या बचाव मोहिमेत शौर्य दाखवल्याबद्दल अनिल वसंत परब यांच्यासह पूर्ण पथकाला हे पदक मिळाले आहे. जीव धोक्यात घालून मुंबईकरांच्या सुरक्षेसाठी कटिबद्ध असणाऱ्या मुंबई अग्निशमन दलाच्या जवानांनी गेल्या वर्षी चेंबूरमध्ये बंद पडलेल्या मोनो रेलमधून ५८२ प्रवाशांची सुटका केली होती. या बचाव कार्यात अग्रेसर असणाऱ्या १३ जवानांना उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल स्वातंत्र्य दिनानिमित्त राष्ट्रपतींचे शौर्यपदक जाहीर करण्यात आले आहे.

चेंबूर ते भक्ती पार्क दरम्यान, म्हैसूर कॉलनीजवळ १९ ऑगस्ट २०२५ रोजी सायंकाळच्या सुमारास मोनो रेलमध्ये तांत्रिक बिघाड होऊन ५८२ प्रवासी अडकून पडले. परिणामी, प्रवाशांच्या सुरक्षिततेला मोठा धोका निर्माण झाला. त्यावेळी गाडीतील वीज पुरवठा खंडित झाल्यानं अंधार पसरला व प्रवासी भयभीत झाले. याच सुमारास प्रवाशांनी मोनो रेलचे दरवाजे आतून उघडण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यात त्यांना यश आले नाही. श्वास अधिकच गुदमरू लागल्याने प्रवाशांनी मोनो रेलच्या काचा आतून फोडल्या. त्यामुळे प्रवाशांना काहीसा दिलासा मिळाला. मात्र, धोका टळला नव्हता. त्यावेळी बचावकार्यासाठी मुंबई अग्निशमन दल दाखल झाले आणि दोन तासांपेक्षा अधिक काळ त्यांनी बचावकार्य केले. या जवानांनी ४० ते ५० फूट उंचीवर बंद पडलेल्या मोनो रेलमधून ५८२ प्रवाशांची सुखरूप सुटका केली. या उल्लेखनीय कामगिरीबाबत या १३ कर्मचारी-अधिकाऱ्यांना राष्ट्रपतींचे शौर्यपदक जाहीर करण्यात आले. अनिल परब हे पोईप माजी सरपंच शिवराम पालव यांचे आते भाऊ आहेत. त्यांना मिळालेल्या राष्ट्रपती पुरस्काराबद्दल अभिनंदन होत आहे.