तिलारी नदीत दोघे बुडाल्याची भीती

घोटगेवाडी पुलावरील घटना प्रशासनाकडून शोधाशोध सुरू
​
दोडामार्ग : प्रतिनिधी
​घोटगेवाडी – तिलारी नदीवरील पूल पार करण्याच्या प्रयत्नात दोघे जण वाहून गेल्याची धक्कादायक घटना घोटगेवाडी येथे घडली असून दोघेही नदीत बुडाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

​मिळालेल्या माहितीनुसार, घोटगेवाडी येथील तिलारी नदीवर छत्तीसगड येथील २५ वर्षीय परप्रांतीय युवक व ६ वर्षीय शाळकरी मुलगा पूल पार करत होते. मात्र पाण्याच्या वेगवान प्रवाहाबरोबर दोघेही वाहून गेले. या घटनेचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला आहे.

​घटनेची माहिती मिळताच प्रशासनाने त्वरित हालचाली करत तिलारी धरणातून सोडण्यात येणारे पाणी कमी केले आहे. तसेच वाहून गेलेल्या व्यक्तींचा शोध घेण्यासाठी शोधमोहीम हाती घेण्यात आली आहे. या घटनेबाबत कोनाळचे उपसरपंच रत्नकांत कर्पे यांनी सविस्तर माहिती दिली आहे.

​दरम्यान, नदीत वाहून गेलेल्यांचा लवकरात लवकर शोध घेण्यासाठी प्रशासनाने तातडीने व्यापक शोधमोहीम राबवावी, अशी जोरदार मागणी स्थानिक ग्रामस्थांकडून केली जात आहे.