आंबवली-ताम्हाणे पंचक्रोशीतील सर्व चिरा खाणींचे विशेष तपासणी अभियान राबवावे
भाजपचे तालुकाध्यक्ष रूपेश कदम यांची आग्रही मागणी
देवरूख (प्रतिनिधी):
संगमेश्वर तालुक्यातील आंबवली येथील प्रतीक सावंत या तरूणाचा चिऱ्याची वाहतूक करणाऱ्या ट्रकची धडक बसून मृत्यू झाला होता. या अपघाती मृत्यू प्रकरणाची सखोल आणि निष्पक्ष चौकशी व्हावी तसेच आंबवली-ताम्हाणे पंचक्रोशीतील सर्व चिरा खाणींचे विशेष तपासणी अभियान राबवावे, अशी आग्रही मागणी भाजपचे तालुकाध्यक्ष रूपेश कदम यांनी केली आहे. तशी माहिती त्यांनी आज सोमवारी देवरूख येथील भाजप कार्यालयात घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत दिली आहे.
या पत्रकार परिषदेत बोलताना रूपेश कदम म्हणाले कि, प्रतीक सावंत या तरूणाचा अनधिकृतपणे चिऱ्याची वाहतूक करणाऱ्या ट्रकची धडक बसून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ही घटना अतिशय दुर्देवी असून मनाला वेदना देणारी आहे. आंबवली ते कोसुंब मार्गावर बेकायदेशीरपणे अशाप्रकारे चिऱ्याची वाहतूक होत असून ही वाहने अतिशय भरधाव वेगाने चालवली जात आहेत. आणि याच वाहतूकीचा प्रतीक सावंत बळी ठरला आहे. देवरूख पोलीसांनी प्रतीक सावंत याच्या अपघाती मृत्यू प्रकरणाची सखोल व निष्पक्ष चौकशी करावी, जेणेकरून सावंत कुटुंबाला न्याय मिळेल. आपला चिरा व्यवसायाला कोणताच विरोध नसून परंतु नियमांचे उल्लंघन होत असेल, ओव्हरलोड वाहतूक होत असेल, अनधिकृत उत्खनन होत असेल किंवा वैध परवानगीपेक्षा जास्त उत्खनन होत असेल तर त्याची संबंधित विभागाने चौकशी करून त्यावर कायदेशीर कारवाई करावी, ही आपली भुमिका असल्याचे श्री. कदम यांनी नमूद केले.
ते पुढे म्हणाले कि, आंबवली पंचक्रोशीत सध्या किती चिरा खाणी सुरू आहेत. या प्रत्येक खाणीचा गट नंबर कोणता आहे, त्या खाणीला वैध परवाना आहे का, परवान्याची मुदत किती आहे, प्रत्येक खाणीला किती उत्खननाची परवानगी देण्यात आली आहे, प्रत्यक्ष किती उत्खनन झाले आहे, शासनाला किती राँयल्टी जमा झाली आहे, या खाणींमधून चिरा घेवून जाणाऱ्या प्रत्येक वाहनाकडे वैध वाहतूक पास आहे का, या वाहनांची वजन तपासणी नियमित होते का, क्षमतेपेक्षा जास्त माल वाहून नेणाऱ्या वाहनांवर कारवाई झाली आहे का? आणि प्रतीक सावंत याच्या अपघाताची चौकशी केवळ वाहन चालकापुरती मर्यादित न राहता अपघातामागील वाहन, मालक, वाहतूक व्यवस्था, वाहनाची स्थिती आणि इतर संबंधित बाबींचीही सखोल चौकशी झाली पाहिजे, ही आपली मागणी असल्याचे श्री. कदम यांनी शेवटी सांगितले. या पत्रकार परिषदेप्रसंगी भाजपचे तालुकाध्यक्ष विनोद म्हस्के, तालुका सरचिटणीस सचिन बांडागळे, माजी उपनगराध्यक्ष सुशांत मुळ्ये, दत्ताराम नार्वेकर, विनोद गायकर आदि उपस्थित होते. दरम्यान, प्रतीक सावंत या तरूणाच्या अपघाती मृत्यूप्रकरणी भाजपचे तालुकाध्यक्ष रूपेश कदम हे आक्रमक झाले असल्याचे यावरून दिसून येत आहे.













