आमदार किरण सामंत यांची श्री देव धूतपापेश्वर मंदिराला भेट

राजापूर (प्रतिनिधी) : श्रावण महिन्यातील पवित्र श्रावणी सोमवारनिमित्त राजापूर तालुक्यातील प्रसिद्ध श्री देव धूतपापेश्वर मंदिरात आयोजित सप्ताह कार्यक्रमाला आमदार किरण सामंत यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी देव धूतपापेश्वराचे मनोभावे दर्शन घेत पूजाअर्चा केली. तसेच सप्ताहानिमित्त सुरू असलेल्या विविध धार्मिक कार्यक्रमांची माहिती घेत आयोजक व उपस्थित भाविकांशी संवाद साधला.
आमदार किरण सामंत यांनी मंदिरात भेट देऊन धार्मिक कार्यक्रमात सहभाग घेतला. यावेळी त्यांनी मंदिर व्यवस्थापन आणि सप्ताह आयोजकांकडून कार्यक्रमाची माहिती जाणून घेतली. धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरा जपण्यासाठी अशा उपक्रमांचे आयोजन महत्त्वाचे असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. दर्शनानंतर आमदार किरण सामंत यांनी उपस्थित ग्रामस्थ, भाविक आणि आयोजकांशी संवाद साधला. यावेळी स्थानिक नागरिकांनी विविध विषयांवर चर्चा केली. आमदार सामंत यांनीही उपस्थितांचे म्हणणे जाणून घेत योग्य त्या पातळीवर सहकार्य करण्याची भूमिका व्यक्त केली. यावेळी मंदिर व्यवस्थापनाचे वतीने आ. सामंत यांचा सन्मान करण्यात आला. याप्रसंगी पदाधिकारी, सप्ताहाचे आयोजक, स्थानिक ग्रामस्थ, शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते.