चिपळूण (प्रतिनिधी) : तालुक्यातील सावर्डे खोतवाडी येथील ओम साई केदारनाथ गोविंदा पथकाने यंदाच्या दहीहंडी उत्सवात विक्रमी सात थर रचून चिपळूण व खेड परिसरात आपला दबदबा सिद्ध केला आहे. विविध ठिकाणी दहीहंडी फोडत या पथकाने तालुक्यात नवाच विक्रम प्रस्थापित केला असून त्यांच्या या कामगिरीचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.
यंदाच्या दहीहंडी उत्सवात चिपळूण तालुक्यातील मानाची आमदार शेखर निकम मित्र मंडळ चिपळूण पुरस्कृत दहीहंडी, तसेच भाजप प्रणित चिपळूण दहीहंडी आणि परिसरातील सुमारे २० हून अधिक दहीहंड्या सात थर लावून यशस्वीरीत्या फोडण्यात पथकाला यश आले. सर्वप्रथम खोतवाडी सावर्डे येथील सराव मैदानावरती ग्रामदैवत केदारनाथ श्रीफळ अर्पण करून तेथील हंडी, बाजारपेठेतील शिंदे गट शिवसेना, भवानी मंदिर, सावर्डे परिसरातील, दहिवली, आवाशी खेड, पीरलोटे, चिपळूण परिसरातील अत्यंत शिस्तबद्ध नियोजन, कठोर सराव आणि संघभावनेच्या जोरावर दहीहंड्या फोडून ही उल्लेखनीय कामगिरी साध्य करण्यात आली. ओम साई केदारनाथ गोविंदा पथक, खोतवाडी-सावर्डे हे मंडळ गेली अनेक वर्षे सामाजिक, सांस्कृतिक आणि क्रीडा क्षेत्रात सक्रिय आहे.
गेल्या वर्षापासून या पथकाने चिपळूण तालुक्यासह विविध भागांत जाऊन दहीहंडी स्पर्धांमध्ये सहभाग घेण्यास सुरुवात केली. सातत्यपूर्ण मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर पथकाने अल्पावधीतच स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. यावर्षी पथकाचे प्रशिक्षक प्रशांत चव्हाण आणि विष्णू चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली खेळाडूंनी कठोर सराव केला. त्याचेच फलित म्हणून सात थरांचा मानवी मनोरा यशस्वीपणे उभारण्यात आला. पथकातील लहान मुलांपासून ते अनुभवी गोविंदांपर्यंत सर्वांनी प्रणय चव्हाण निलेश चव्हाण, ओमकार मिस्त्री यांच्या मार्गदर्शनाखाली उत्कृष्ट समन्वय साधत ही कामगिरी पार पाडली. या यशामुळे पथकाला ” सात थरांचा, शेखर सरांचा गोविंदा” म्हणून विशेष ओळख मिळाली असून परिसरातील नागरिक, ग्रामस्थ आणि दहीहंडीप्रेमींनी पथकावर अभिनंदनाचा वर्षाव केला आहे. सावर्डेच्या या पथकाने केलेली विक्रमी कामगिरी तालुक्याच्या क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रासाठी अभिमानास्पद ठरत असून आगामी काळात राज्यस्तरीय स्पर्धांमध्येही हे पथक चमकदार कामगिरी करेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.













