सावर्डे विद्यालयात ‘पाणी आडवा, पाणी जिरवा’ जनजागृती व्याख्यान

चिपळूण (प्रतिनिधी) : सह्याद्री शिक्षण संस्था संचलित गोविंदराव निकम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, सावर्डे येथे ‘पाणी आडवा, पाणी जिरवा’ या विषयावर जनजागृतीपर व्याख्यानाचे नुकतेच आयोजन करण्यात आले.
मार्गदर्शक शिक्षक अशोक बिक्कड यांनी विद्यार्थ्यांना पाणी संवर्धनाचे महत्त्व, रेन वॉटर हार्वेस्टिंग तसेच जलसंधारणाच्या विविध उपाययोजनांची सविस्तर माहिती दिली. यावेळी मार्गदर्शन करताना श्री. बिक्कड यांनी सांगितले की, पाणी हे जीवनाचे मूलभूत साधन असून त्याचे संवर्धन करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. ‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’ म्हणजेच पावसाचे पाणी अडवून ते जमिनीत जिरवणे होय. पावसाचे पाणी वाहून जाऊ न देता त्याचा योग्य पद्धतीने संचय व पुनर्भरण केल्यास भूजल पातळी वाढण्यास मोठी मदत होते. जलसंधारणाच्या कार्याचे महत्त्व स्पष्ट करताना त्यांनी महाराष्ट्रातील दुष्काळजन्य परिस्थिती, घटणारी भूजल पातळी आणि जलसंधारणाच्या उपाययोजनांची आवश्यकता याबाबत विद्यार्थ्यांना माहिती दिली. विहिरी व बोअरवेलच्या परिसरात पुनर्भरण खड्डे तयार करून त्यामध्ये खडी व वाळूचा वापर केल्यास पावसाचे पाणी जमिनीत मुरवता येते, त्यामुळे भूजल पातळी वाढण्यास मदत होते, असे त्यांनी स्पष्ट केले.
तसेच डोंगराळ भागातून वाहून जाणारे पाणी अडविण्यासाठी बंधारे, चाऱ्या व विविध जलसंधारणाच्या उपाययोजना करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. पाणी जमिनीत मुरल्यामुळे परिसरातील वनस्पतींची वाढ होऊन पर्यावरणाचे संवर्धन होण्यास मदत होते. त्यामुळे जलसंधारणाबरोबरच पर्यावरणाचे संरक्षण करण्याची जबाबदारीही प्रत्येकाने स्वीकारली पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले. विद्यार्थ्यांना ‘पाणी जपून वापरा, पाणी वाचवा’ असा संदेश देत त्यांनी ‘जल है तो कल है’ या घोषवाक्याद्वारे पाणी संवर्धनाचे महत्त्व अधोरेखित केले. या कार्यक्रमाला विद्यालयाचे प्राचार्य राजेंद्र वारे, पर्यवेक्षक महेश कुलकर्णी तसेच सर्व शिक्षकवृंद उपस्थित होते. विद्यार्थ्यांनीही या जनजागृतीपर व्याख्यानाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.