देवळे येथे नसरे परिवाराची पर्यावरणपूरक गणेशोत्सव सजावट

बांबू आणि गवताच्या माध्यमातून साकारले शेतकरी-निसर्गाचे दृढ नाते!

रत्नागिरी : पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत यंदा संगमेश्वर तालुक्यातील देवळे वाणेवाडी येथील नसरे परिवाराने गणेशोत्सवात एक अत्यंत आगळीवेगळी आणि लक्षवेधी सजावट साकारली आहे. प्लास्टिक किंवा थर्मोकोलचा अजिबात वापर न करता केवळ बांबू, गवत आणि कागद यांसारख्या नैसर्गिक साहित्याचा वापर करून त्यांनी ही सजावट केली असून, त्यातून शेतकरी आणि निसर्गाचे अतूट नाते प्रभावीपणे मांडले आहे.

​या पर्यावरणपूरक सजावटीसाठी नसरे परिवाराला तब्बल आठ दिवसांचा कालावधी लागला. अत्यंत सुबक आणि बारकाईने केलेल्या या कामातून निसर्गाशी जुळलेले ग्रामीण जीवन आणि शेतकऱ्यांचे महत्त्व अधोरेखित होते. विशेष म्हणजे, नसरे परिवाराची श्री गणेशाची मूर्तीदेखील पूर्णपणे शाडूच्या मातीची असून, ती पूर्णतः पर्यावरणस्नेही आहे.

​आजच्या काळात सणांच्या मोहात मोठ्या प्रमाणात प्लास्टिक व हानिकारक रसायनांचा वापर होत असताना, नसरे परिवाराने घेतलेला हा पुढाकार समाजासाठी अत्यंत मार्गदर्शक ठरत आहे. निसर्गाचे रक्षण करणे आणि आपल्या बळीराजाच्या कष्टमय जीवनाचा सन्मान करणे हाच खरा उत्सव आहे, असा संदेश या सजावटीच्या माध्यमातून देवळे गावातील नसरे परिवाराने दिला आहे. या अनोख्या आणि देखण्या सजावटीची पाहणी करण्यासाठी ग्रामस्थ आणि भाविक मोठ्या संख्येने गर्दी करत असून, नसरे परिवाराच्या या कल्पकतेचे सर्वत्र भरभरून कौतुक होत आहे.