मुंबई : मुंबईतील लालबाग परिसरात गणेशोत्सवादरम्यान भाविकांची मोठी गर्दी होत असताना चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे समोर आले आहे. दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांना लक्ष्य करून सोन्याचे दागिने, मोबाईल आणि रोकड चोरीला गेल्याच्या तक्रारी काळाचौकी पोलिसांकडे दाखल झाल्या आहेत. याप्रकरणी पोलिसांनी मध्य प्रदेशातील इंदूर येथील 2 तरुणांना अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 14 सप्टेंबर रोजी लालबाग परिसरात वर्षा फोपाले (67) या दर्शनाच्या रांगेत उभ्या होत्या. गर्दीत साडी सावरत असताना त्यांच्या गळ्यातील सुमारे 70,000 रुपये किमतीचा 10 ग्रॅम वजनाचा सोन्याचा हार गायब झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी परिसरात शोध घेतल्यानंतर काळाचौकी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
याच ठिकाणी धनंजय बलसरफ (49) यांच्या 90,000 रुपये किमतीच्या 13 ग्रॅम सोन्याच्या साखळीचीही चोरी झाल्याची तक्रार करण्यात आली आहे.
दरम्यान, दुपारी एका सुरक्षा रक्षकाचा मोबाईल आणि रोकड चोरीला गेल्याची घटना घडली. मायकल नाडर (28) हे दर्शनाच्या रांगेत असताना त्यांच्या खिशातून सुमारे 25,000 रुपये किमतीचा मोबाईल आणि 2,300 रुपये रोख रक्कम चोरीला गेली. चोरी लक्षात येताच त्यांनी आरडाओरडा केला. त्यानंतर भाविकांनी 2 संशयितांचा पाठलाग करून त्यांना पकडले. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून दोघांना ताब्यात घेतले. आरिफ सक्सेनसिंग गुज्जर (24) आणि सोमनाथ समनसिंग राठोड (23) अशी आरोपींची नावे आहेत.
याशिवाय गणेश गल्लीतील मुंबईचा राजा येथे दर्शनासाठी आलेल्या आरती कावळे (60) यांच्या सुमारे 2 लाख रुपये किमतीच्या 25 ग्रॅम सोन्याच्या साखळीचीही चोरी झाली. या प्रकरणाचा तपास सुरू आहे. अटक केलेल्या दोघांचा इतर चोरीच्या घटनांशी संबंध आहे का, याचा पोलीस तपास करत आहेत. भाविकांनी गर्दीत दागिने, मोबाईल आणि मौल्यवान वस्तूंची काळजी घ्यावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.











