गौरव पोंक्षे माखजन:
प्राथमिक आरोग्य केंद्र, अडरे यांच्या वतीने न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज, सती-चिंचघरी येथे ११ वा आयुर्वेद दिन साजरा करण्यात आला. यावर्षीची संकल्पना “निरोगी आरोग्यासाठी आयुर्वेद” अशी होती.
या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांमध्ये आयुर्वेदाबाबत जनजागृती करणे, निरोगी जीवनशैलीचा अवलंब करण्यासाठी प्रोत्साहित करणे तसेच प्रतिबंधात्मक आरोग्यसेवेचे महत्त्व समजावून देणे हा होता.
कार्यक्रमामध्ये तालुका आरोग्य अधिकारी डॉ. ज्योती यादव, एन.आय.एम.ए. चे अध्यक्ष डॉ. खोत व प्राथमिक आरोग्य केंद्र, अडरेच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. गायत्री फडके यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
यावेळी विद्यार्थ्यांना विविध विषयांबाबत माहिती देण्यात आली, आयुर्वेदाचे महत्त्व व दैनंदिन जीवनातील उपयोग निरोगी आरोग्यासाठी संतुलित व पौष्टिक आहाराचे महत्त्व दिनचर्या व ऋतुचर्येचे आरोग्यातील महत्त्व, नियमित योग, व्यायाम व शारीरिक हालचालींचे फायदे,पुरेशी झोप व वैयक्तिक स्वच्छतेचे महत्त्व,मानसिक आरोग्य व तणावमुक्त जीवनशैली, तुळस, हळद, आवळा, आले आदी औषधी वनस्पतींचे महत्त्व् आजार होण्यापूर्वीच आरोग्याची काळजी घेण्याचे महत्त्व, कोणतीही औषधे स्वतःहून न घेता तज्ज्ञांच्या सल्ल्यानेच औषधांचा वापर करण्याबाबत मार्गदर्शन,निरोगी जीवनासाठी चांगल्या आहार-विहाराच्या सवयी अंगीकारण्याचे आवाहन.
कार्यक्रमादरम्यान आरोग्य सहाय्यिका श्रीम. उषा जाधव यांनी उपस्थितांना आयुर्वेद दिनाची प्रतिज्ञा दिली. कार्यक्रमाच्या शेवटी गटप्रवर्तक श्री. जाबरे यांनी आभार प्रदर्शन केले.या कार्यक्रमास न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज, सती-चिंचघरी येथील मुख्याध्यापक व शिक्षकवृंद तसेच आरोग्य सेवक श्री. निखिल वारके, आरोग्य सेवक श्री. शेखर बेडेकर, आशा सेविका उपस्थित होते. मुख्याध्यापक व शिक्षकवृंदांनी कार्यक्रमास सहकार्य करून विद्यार्थ्यांच्या सहभागासाठी आवश्यक मार्गदर्शन केले.












