सावंतवाडीच्या नगराध्यक्षा सौ. श्रद्धाराजे भोसले यांचा स्थानिक महिलांसोबत फुगडीचा फेर!

संस्थांनच्या सुनबाईंनी गणेशोत्सवाच्या निमित्ताने केला लोकसंस्कृतीचा जागर

​सावंतवाडी (प्रतिनिधी):
गणेशोत्सव आणि गौरी-गणपतीचा सण म्हणजे संपूर्ण कोकणभूमीत भक्तिभाव, उत्साह आणि चैतन्याचे उधाण! घराघरांतून मांगल्य अन् पारंपरिक संस्कृतीचा सुगंध दरवळत असताना, सावंतवाडीत या उत्सवाची शोभा द्विगुणित करणारा एक अत्यंत आपुलकीचा आणि भावुक प्रसंग पाहायला मिळाला. सावंतवाडी शहराच्या प्रथम नागरिक, लोकनियुक्त नगराध्यक्षा तथा सावंतवाडी संस्थानच्या सूनबाई सौ. श्रद्धाराजे भोसले यांनी श्री गणेशाच्या दर्शनादरम्यान स्थानिक महिलांसोबत थेट फुगडीचा फेर धरून लोकसंस्कृतीचा जणू जयघोषच केला.

​गौरी-गणपतीच्या या पावन काळात सावंतवाडीत घरोघरी गणरायाचे आगमन झाले आहे. या पार्श्वभूमीवर, शहराच्या प्रथम नागरिक सौ. श्रद्धाराजे भोसले यांनी विविध भागांत जाऊन गणेश दर्शनाचा आस्वाद घेतला. सावंतवाडी संस्थानच्या सून आणि शहराच्या सर्वोच्च लोकप्रतिनिधी असूनही त्यांनी कोणतीही औपचारिकता मध्ये येऊ दिली नाही. सर्वसामान्य जनतेच्या दारात जाऊन दर्शन घेण्याला प्राधान्य देत, त्यांनी लोकप्रतिनिधी आणि नागरिकांमधील आपुलकीच्या नात्याचा एक वस्तुपाठच घालून दिला.

​दर्शनादरम्यान एका घरात स्थानिक महिलांचा पारंपरिक फुगडीचा खेळ रंगला होता. कोकणाची हीच जिवंत लोकसंस्कृती, परंपरा आणि सणाचा नितांत उत्साह पाहून सौ. श्रद्धाराजे भोसले स्वतःला रोखू शकल्या नाहीत. कोणत्याही बडेजावाशिवाय अतिशय सहजतेने आणि उत्साहाने त्या या खेळात सहभागी झाल्या आणि त्यांनी स्थानिक महिलांसोबत फुगडीचा रंगतदार फेर धरला.

​आपल्या लाडक्या लोकप्रतिनिधीला आणि संस्थानच्या सूनबाईंना अशा प्रकारे आपल्यात मिसळून आनंदाने फुगडी खेळताना पाहून उपस्थित महिला व नागरिक भारावून गेले. लोकपरंपरेचा सन्मान करत सर्वसामान्यांच्या आनंदात तल्लीन होऊन साजरा झालेला हा क्षण सावंतवाडीतील यंदाच्या गणेशोत्सवाच्या पटलावर एक अविस्मरणीय आणि सुंदर आठवण बनून कोरला गेला आहे.