मंडणगड प्रतिनिधी : मंडणगड तालुका कुणबी सेवा संघाच्या वतीने यंदाचा ४०वा सार्वजनिक गणेशोत्सव उत्साहात यंदा साजरा करण्यात आला. सामाजिक एकोपा, सांस्कृतिक परंपरा आणि समाजबांधवांच्या सहभागातून गेल्या चार दशकांपासून हा गणेशोत्सवाची परंपरा सुरू आहे.
कुणबी सेवा संघाची स्थापना श्री. आर. बी. गोवळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी १९४९ साली केली. त्यानंतर कुणबी समाजाचे नेते व माजी आमदार जी. डी. सकपाळ यांनी सहकाऱ्यांना सोबत घेऊन कुणबी सेवा संघाचे कार्य विस्तारले. मंडणगड तालुक्यात समाजासाठी सार्वजनिक इमारत असावी, ही संकल्पना त्यामागे होती.
कुणबी सेवा संघाचे कुणबी भवन उभारण्यासाठी लक्ष्मण पोस्टुरे यांनी सदानंद बैकर यांना सांगून ठेवले होते की, समाजाला इमारतीची गरज भासेल त्यावेळी आपल्या जमिनीतून दहा गुंठे जमीन समाजाला द्यावी. सदानंद बैकर यांनी दिलेला शब्द पाळत दहा गुंठे जमीन कुणबी सेवा संघाच्या नावाने दिली. याच जागेवर आज मंडणगड बाजारपेठेत दिमाखात कुणबी भवन उभे आहे.
कुणबी समाजाने गावागावातून तसेच घराघरातून आर्थिक मदत देत कुणबी भवनाच्या उभारणीस हातभार लावला. काही समाजबांधवांनी श्रमदानही केले. या सामूहिक प्रयत्नांतून १९८६ मध्ये कुणबी भवनाची इमारत पूर्ण झाली.
यानंतर १९८७ मध्ये माजी आमदार जी. डी. सकपाळ यांनी कुणबी भवनमध्ये सार्वजनिक उत्सव साजरा करण्याची इच्छा व्यक्त केली. सभेत सर्वानुमते गणेशोत्सव सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. कुणबी समाजाचा राजा म्हणून गणरायाचे ‘मंडणगडचा राजा’ असे नामकरण करण्यात आले. जी. डी. सकपाळ व त्यांच्या पत्नी सुलभाताई सकपाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पहिल्या सार्वजनिक गणेशोत्सवाचे आयोजन करण्यात आले.
या गणेशोत्सवाच्या सुरुवातीच्या काळात विठ्ठल भोसले, गोपाळ साळवी, लक्ष्मण पोस्टुरे, महादेव सापटे, सोनू बर्वे, महादेव शिगवण, सदानंद बैकर, आर. बी. गोवके, बी. एम. लोंढे, गणपत घाडगे, धोंडू मांडवकर, लक्ष्मणराव पालवणकर, बाळाराम घडवले, शिवराम भोजणे, भीमसेन धामणे, सहदेव रहाटे, पांडुरंग भानसे, नागोजी आंगे, दौलत बैकर, गणपत वलार, लक्ष्मण भुवड, बारक्या भुवड, दौलत भवणे, जनार्दन दवंडे, भिकू भुवड, दौलतराव पोस्टुरे, सोनू हुमणे, सहदेव भवणे, सहदेव दवंडे, मनोज घागरूम, माजी एसीपी रमेश घडवले, रघुनाथ पोस्टुरे विजय ऐनेकर सचिन माळी आदी समाजबांधवांचे योगदान राहिले.
गेल्या चार दशकांच्या या परंपरेत गणेशोत्सवाच्या माध्यमातून झांखडी नृत्य, मंगळागौरी, भजन, कीर्तन आदी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. त्यामुळे हा उत्सव केवळ धार्मिक कार्यक्रम न राहता समाजातील एकोपा आणि सांस्कृतिक परंपरा जपणारा उत्सव ठरला आहे.
सध्या कुणबी समाजाचे नेते दौलतराव पोस्टुरे यांच्या नेतृत्वाखाली मंडणगड तालुका कुणबी सेवा संघाचा गणेशोत्सव उत्साहात साजरा होत असून, यंदाच्या ४०व्या गणेशोत्सवानिमित्त समाजबांधवांमध्ये विशेष उत्साहाचे वातावरण आहे.











