कार्यकर्त्याच्या निधनानंतरही आठवण जपणाऱ्या वैभव खेडेकर यांच्या भूमिकेची शहरात चर्चा
खेड (प्रतिनिधी) : भारतीय जनता पक्ष व राजवैभव प्रतिष्ठान यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘खेडचा राजा’ या सार्वजनिक गणेशोत्सवाची सांगता यंदा मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात झाली. गणरायाच्या विसर्जनासाठी काढण्यात आलेल्या भव्य मिरवणुकीत विविध आकर्षणे पाहायला मिळाली. मात्र, या मिरवणुकीत सर्वाधिक चर्चेचा विषय ठरला तो काही दिवसांपूर्वी अपघाती निधन झालेल्या नईम चौगुले यांच्या कटआउटचा.
खेडचे माजी नगराध्यक्ष व भाजप नेते एडवोकेट वैभव खेडेकर यांचे खंदे समर्थक म्हणून नईम चौगुले यांची ओळख होती. काही दिवसांपूर्वी मुंबई-गोवा महामार्गावर झालेल्या अपघातात चौगुले यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यांच्या आकस्मिक निधनाने कुटुंबीयांसह मित्रपरिवार, सहकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये हळहळ व्यक्त करण्यात आली होती.
याच पार्श्वभूमीवर ‘खेडचा राजा’च्या विसर्जन मिरवणुकीत नईम चौगुले यांचे कटआउट लावण्यात आले होते. मिरवणुकीतून गणरायाला निरोप देताना दिवंगत कार्यकर्त्याची आठवण जपण्यात आल्याने उपस्थितांचे लक्ष या कटआउटकडे वेधले गेले. मिरवणुकीत सहभागी नागरिक व कार्यकर्त्यांमध्येही याबाबत चर्चा सुरू होती.
कार्यकर्ता आणि नेतृत्व यांच्यातील जिव्हाळ्याचे नाते अधोरेखित करणारा हा प्रसंग असल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली. कार्यकर्ता हयात नसतानाही त्याची आठवण सार्वजनिक उपक्रमातून जपली गेल्याने या कृतीची शहरात चर्चा रंगली होती.
दरवर्षीप्रमाणे यंदाही ‘खेडचा राजा’च्या विसर्जन मिरवणुकीत मोठ्या संख्येने भाविक, कार्यकर्ते व नागरिक सहभागी झाले होते. ढोल-ताशांचा गजर, विविध वाद्यांचे सूर आणि गणरायाच्या जयघोषात मिरवणूक उत्साहात पार पडली. या उत्साहाच्या वातावरणात दिवंगत नईम चौगुले यांचे कटआउट मात्र अनेकांसाठी भावनिक क्षण ठरले.
राजकीय व सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या व्यक्तींच्या सहकाऱ्यांशी असलेल्या संबंधांची चर्चा नेहमीच होत असते. मात्र, दिवंगत कार्यकर्त्याची आठवण गणेशोत्सवासारख्या सार्वजनिक उत्सवाच्या माध्यमातून जपली गेल्याने यंदाच्या ‘खेडचा राजा’च्या विसर्जन मिरवणुकीला या प्रसंगामुळे एक वेगळा भावनिक संदर्भ लाभला.
नईम चौगुले यांच्या अकाली निधनानंतर त्यांच्या आठवणीला अशा प्रकारे उजाळा मिळाल्याने ‘कार्यकर्ता गेल्यानंतरही त्याची आठवण जपली’ अशी चर्चा खेड शहरात दिवसभर ऐकायला मिळत होती.











