मळगाव येथे भूजल पुनर्भरणासाठीच्या ‘जलतारा’ खड्ड्याचे उद्घाटन
सावंतवाडी । वार्ताहर : सावंतवाडी तालुक्यातील मळगाव बादेकरवाडी येथे भूजल पुनर्भरणासाठी तयार करण्यात आलेल्या जलतारा खड्ड्याचे उद्घाटन राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. नितेश राणे यांच्या हस्ते झाले. पावसाचे पाणी जमिनीत जिरवून भूजल पातळी वाढविण्यासाठी अशा उपाययोजना महत्त्वपूर्ण ठरणार आहेत.जिल्ह्यात पाणी संवर्धन आणि भूजल पुनर्भरणाच्या कामांना गती देण्याच्या दृष्टीने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. हा उपक्रम फक्त फोटो काढण्यापुरती न ठेवता महाराष्ट्रात आता जी परिस्थिती निर्माण झालेली आहे ती या उपक्रमामुळे दूर होईल, असा विश्वास पालकमंत्री नितेश राणे यांनी यावेळी व्यक्त केला.
मळगाव येथे शेती पाहणी दौऱ्या निमित्त आलेल्या पालकमंत्री नितेश राणे यांनी जलतारा खड्ड्याचे भूमिपूजन केले यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अपूर्वा बासूर, उपविभागीय अधिकारी विरसिंग वसावे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री नाईकनवरे, लघू पाटबंधारे, जलसंधारण विभागाचे अधिकारी यांच्यासह, पंचायत समिती उपसभापती गौरव मुळीक, माजी जिल्हा परिषद सभापती गुरुनाथ पेडणेकर, तालुका मंडळ अध्यक्ष मधुकर देसाई, चंद्रकांत जाधव, माजी सरपंच गणेश पेडणेकर, निलेश राऊळ, उमेश पेडणेकर, सिद्धेश तेंडोलकर तसेच इतर स्थानिक ग्रामस्थ व संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.












