रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या प्रेरणेने मुंबईत अनंत चतुर्दशीनंतर जुहू चौपाटीवर हजारो अनुयायांचे स्वच्छता अभियान

अनंत चतुर्दशीच्या पार्श्वभूमीवर गणेश विसर्जनानंतर जुहू चौपाटीवर निर्माण झालेला कचरा आणि निर्माल्य स्वच्छ करण्यासाठी जगद्गुरु श्रीमद् रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या प्रेरणेने मुंबईतील हजारो अनुयायांनी शनिवारी सकाळी स्वच्छता अभियान राबविले. जगद्गुरु नरेंद्राचार्यजीने स्वच्छता कार्यासाठी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत हजारो अनुयायी पहाटेच जुहू किनारी एकवटले.
शनिवारी २६ सप्टेंबर रोजी सकाळी ६ वाजता या स्वच्छता अभियानाला सुरुवात झाली. काही तासांतच जुहू चौपाटी परिसरातून गणेश विसर्जनानंतर जमा झालेले निर्माल्य, प्लास्टिक आणि अन्य कचरा मोठ्या प्रमाणावर संकलित करण्यात आला. समुद्रकिनारा स्वच्छ ठेवण्याबरोबरच पर्यावरण संवर्धन आणि सार्वजनिक स्वच्छतेचा संदेश या माध्यमातून देण्यात आला.
अनंत चतुर्दशीनिमित्त शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत जुहू चौपाटीवर श्री गणेशमूर्तींचे विसर्जन सुरू होते. विसर्जनाचा कार्यक्रम पूर्ण झाल्यानंतर अवघ्या काही तासांतच जगद्गुरुश्रींचे हजारो अनुयायी स्वच्छतेसाठी किनारी परिसरात सज्ज झाले. सेवा भावनेतून राबविण्यात आलेल्या या उपक्रमात मोठ्या संख्येने महिला, पुरुष आणि सेवक सहभागी झाले.
या स्वच्छता अभियानात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस, अभिनेते अजय देवगण, कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्यासह अनेक मान्यवरांनीही सहभाग घेतला. स्वच्छता अभियानानंतर अमृता फडणवीस यांनी जगद्गुरु श्रीमद् रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या अनुयायांनी केलेल्या स्वच्छता कार्याचे कौतुक केले.

शासनाच्या वतीनेही जगद्गुरु श्रीमद् रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या प्रेरणेने राबविण्यात आलेल्या या स्वच्छता कार्याची दखल घेत गौरव करण्यात आला.

जगद्गुरुश्रींच्या प्रेरणेने आणि मार्गदर्शनानुसार देशभरात त्यांचे लाखो अनुयायी विविध ठिकाणी स्वच्छता अभियान राबवत आहेत. मंदिर परिसर, सार्वजनिक ठिकाणे तसेच समुद्रकिनारे स्वच्छ ठेवण्याबरोबरच पर्यावरण संवर्धन आणि सामाजिक सेवेला प्रोत्साहन देण्याचे कार्य या अभियानाच्या माध्यमातून सुरू आहे.