अणाव येथे पहिला वनराई बंधाऱ्याचा शुभारंभ

जिल्ह्यात १० हजार बंधाऱ्यांचा संकल्प!

 सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेची धडक मोहीम;

सिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी

 

दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर भविष्यातील पाणीटंचाईला आत्तापासूनच आळा घालण्यासाठी ‘पाणी अडवा… पाणी जिरवा’ या संकल्पनेला प्रत्यक्ष कृतीची जोड देत जिल्हा परिषद सिंधुदुर्गने धडक मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेअंतर्गत जिल्ह्यातील या वर्षीचा पहिला वनराई बंधारा अणाव-परबवाडी येथे उभारण्यात आला. जिल्ह्यातील आठही तालुक्यांमध्ये येत्या १५ दिवसांत १० हजारांहून अधिक वनराई व कच्चे बंधारे उभारण्याचा संकल्प जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रमोद कामत यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आला आहे.

जिल्हा परिषद सिंधुदुर्ग, रोटरी क्लब ऑफ कुडाळ, संविता आश्रम पणदूर आणि आकार फाउंडेशन कुडाळ यांच्या संयुक्त विद्यमाने अणाव-परबवाडी येथे या वनराई बंधाऱ्याचे काम करण्यात आले. दुष्काळसदृश परिस्थितीत पाण्याचा प्रत्येक थेंब अडवून तो जमिनीत जिरविणे, भूजलपातळी वाढविणे आणि आगामी काळातील पाणीटंचाईची तीव्रता कमी करणे, हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश आहे.

यावेळी जिल्हा परिषद उपाध्यक्ष दादा साईल यांनी सांगितले की, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आठही तालुक्यांना ट्रिगर-१ जाहीर करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर पालकमंत्री नितेश राणे, आमदार निलेश राणे आणि आमदार दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत पाणी बचत व जलसंवर्धनासाठी विविध उपाययोजना करण्याचे निर्देश देण्यात आले. त्यानुसार जिल्हा परिषदेने मोठ्या प्रमाणावर वनराई व कच्चे बंधारे उभारण्याचा निर्णय घेतला आहे.

“अणाव येथून या उपक्रमाला सुरुवात झाली असून, येत्या १५ दिवसांत जिल्ह्यातील सर्व गावांमध्ये १० हजारांपेक्षा अधिक बंधारे उभारण्याचा संकल्प आहे. भविष्यात उद्भवणाऱ्या दुष्काळी परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी जलसंधारणाची कामे आत्तापासूनच हाती घेणे आवश्यक आहे,” असे दादा साईल यांनी स्पष्ट केले.लोकसहभागातून जलसंधारणाला बळ

अणाव येथील बंधारा उभारणीच्या माध्यमातून प्रशासन, स्थानिक स्वराज्य संस्था आणि सामाजिक संस्थांच्या सहभागातून जलसंधारणाची मोहीम अधिक व्यापक करण्याचा संदेश देण्यात आला. पावसाचे पाणी वाहून जाण्याऐवजी ते स्थानिक पातळीवर अडवून जमिनीत मुरविण्यासाठी अशा छोट्या बंधाऱ्यांची साखळी निर्माण करण्यावर भर दिला जाणार आहे.

या कार्यक्रमास कुडाळ सभापती मिलिंद नाईक, गटविकास अधिकारी प्रवीण हिर्लेकर, अणाव सरपंच लीलाधर अणावकर, रोटरी क्लब ऑफ कुडाळचे अध्यक्ष मकरंद नाईक, संविता आश्रमचे संदीप परब, रोटरी सेक्रेटरी राकेश म्हाडदळकर, राजन बोभाटे, असिस्टंट गव्हर्नर अभिषेक माने, राजीव पवार, उपसरपंच अदिती अणावकर, कृषी अधिकारी संदेश परब, विनायक अणावकर, महेश परब, ग्रामपंचायत सदस्य मृणाल परब, सुवर्णा परब, किरण आंगणे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अणावपासून सुरू झालेली ही जलसंधारणाची मोहीम आता संपूर्ण जिल्ह्यात पोहोचणार असून, १० हजार बंधाऱ्यांच्या माध्यमातून ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’चा संकल्प प्रत्यक्षात उतरविण्याचे आव्हान जिल्हा परिषदेने स्वीकारले आहे.