एम-सँड प्रकल्पावरून उपनगराध्यक्ष देविदास गवस आक्रमक; मासिक सभेत जोरदार खडाजंगी
दोडामार्ग:प्रतिनिधी
कसई दोडामार्ग नगरपंचायत हद्दीत नियमबाह्यपणे ‘एम-सँड’ (M-Sand) प्रकल्प उभारण्यासाठी नगरपंचायतीच्याच एका माणसाने चक्क २५ लाख रुपये लाच घेतल्याचा सनसनाटी आरोप उपनगराध्यक्ष देविदास गवस यांनी मासिक सभेत केला. या गंभीर आरोपामुळे नगरपंचायत वर्तुळात आणि राजकीय क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे.
कसई दोडामार्ग नगरपंचायतीची मासिक सभा आज मंगळवारी नगरपंचायतीच्या सभागृहात उपनगराध्यक्ष देविदास गवस यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या सभेला नगरसेवक संतोष नानचे, रामचंद्र ठाकूर, राजू प्रसादी, रामराव गावकर, पांडुरंग बोर्डेकर यांच्यासह महिला नगरसेविका, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
ग्रामस्थांचा विरोध असताना प्रकल्प होतोच कसा?
सभेचे कामकाज सुरू असताना उपनगराध्यक्ष देविदास गवस यांनी एम-सँड प्रकल्पाचा मुद्दा उपस्थित करत अत्यंत आक्रमक भूमिका घेतली. “इतर गावांमध्ये ग्रामस्थ अशा एम-सँड प्रकल्पांना तीव्र विरोध करतात, मग आपल्या नगरपंचायत हद्दीत हा प्रकल्प उभा राहतोच कसा? हा प्रकल्प करण्यासाठी नगरपंचायतीमधील कोणीतरी २५ लाख रुपये घेतले आहेत. नेमका काय प्रकार चाललाय नगरपंचायतीत?” असा थेट सवाल उपस्थित करत त्यांनी जोरदार हल्लाबोल केला.
चौकशीची जोरदार मागणी
उपनगराध्यक्षांच्या या खळबळजनक आरोपानंतर सभागृहात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी झाली. माजी नगराध्यक्ष व नगरसेवक संतोष नानचे, रामचंद्र ठाकूर, राजू प्रसादी आदींनी या प्रकरणात अत्यंत आक्रमक भूमिका घेत, २५ लाखांचा गैरव्यवहार नेमका कोणी केला याची निष्पक्ष चौकशी झालीच पाहिजे अशी जोरदार मागणी लावून धरली.
यावर उपनगराध्यक्ष देविदास गवस यांनी संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत. नगरपंचायतीमधील या कथित २५ लाखांच्या लाचखोरी प्रकरणामुळे आता तालुक्यातील राजकारण चांगलेच तापले आहे.












