आ. निकम यांच्या हस्ते आयुषचा सत्कार; उज्ज्वल क्रिकेट कारकिर्दीसाठी दिल्या शुभेच्छा!
चिपळूण (प्रतिनिधी) : चेन्नई सुपर किंग्जचा युवा क्रिकेटपटू तसेच भारतीय १९ वर्षांखालील क्रिकेट संघाचा कर्णधार आयुष म्हात्रे यांनी मुंबई येथे आ. शेखर निकम यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी आमदार निकम यांच्या हस्ते आयुषचा सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी आमदार शेखर निकम, सचिन कोळी, अजित यशवंतराव, मुंबई रणजी संघाचे यष्टीरक्षक हार्दिक तामोरे, आयुषचे वडील तथा चिपळूण क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष दशरथ दाभोळकर आदी उपस्थित होते. यावेळी आमदार शेखर निकम यांनी आयुष म्हात्रे याच्या क्रिकेटमधील उल्लेखनीय कामगिरीचे कौतुक करून त्याचे अभिनंदन केले. कमी वयात राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या फलंदाजीचा ठसा उमटवत भारतीय १९ वर्षांखालील संघाचे नेतृत्व करण्याची संधी मिळणे ही अभिमानाची बाब असल्याचे त्यांनी नमूद केले. यावेळी आ. निकम यांनी आयुषच्या पुढील क्रिकेट कारकिर्दीसाठी शुभेच्छा देत, आगामी काळात त्याने भारतीय क्रिकेटमध्ये आणखी मोठे यश संपादन करावे, अशी सदिच्छा व्यक्त केली. तसेच त्याच्या भावी वाटचालीसाठी आवश्यक ते प्रोत्साहन आणि शुभेच्छा सदैव राहतील, असेही त्यांनी सांगितले.












