डेरवण हॉस्पिटल कडे जाणाऱ्या रस्त्याची दुरावस्था

वर्षानुवर्षे खड्डेमय रस्ता जैसे थे

गौरव पोंक्षे माखजन:
सावर्डे येथून पंत वालावलकर रुग्णालयाकडे जाणाऱ्या रस्त्याची अवस्था बिकट झाली आहे.वर्षानुवर्षे या रस्त्याची ही अवस्था जैसे थे असल्याने नाराजीचा सूर उमटत आहे.चिपळूण तालुक्यातील अद्ययावत अशा वालावलकर रुग्णालयात नुसत्या रत्नागिरी जिल्ह्यातूनच नव्हे तर सिंधुदुर्गातून देखील रुग्ण मोठ्या संख्येने येत असतात.परंतु सावर्डे ते डेरवण हॉस्पिटल पर्यंत चा रस्ता अक्षरशः उखडला आहे.मोठाले खड्डे पडले आहेत.सर्वत्र खडी बाहेर पडली आहे.पावसात मोठ्या प्रमाणात पाणी साचत आहे.खड्यांचा अंदाज न आल्याने वाहने आपटण्याचे प्रमाण अधिक आहे.या साऱ्या गंभीर परिस्थिकडे प्रशासन डोळेझाक करत असल्याचे चित्र आहे.
अत्यवस्थ रुग्णाला घेऊन, वेगाने रुग्णालयाकडे येणाऱ्या रुग्णवाहिका खड्ड्यात आपटत जात आहे.याचाही त्रास रुग्णांना होत आहे.खड्डेमय रस्त्यामुळे गाड्यांच्या रहदारी मुळे सर्वत्र धुळीचे लोट पसरत आहेत.
खर तर चिपळूण संगमेश्वर चे आमदार शेखर निकम यांच्या सावर्डे येथील मुख्य कार्यालयापासून अगदी काही मीटर अंतरावर हा रस्ता आहे.अगदी आमदारांच्या अंगणातच खड्डे असल्यासारखी परिस्थिती पाहायला मिळत आहे.डेरवण हॉस्पिटल मुळे या रस्त्याला मोठी रहदारी असते.गर्भवती महिला.देखील या हॉस्पिटल मध्ये येण्याचे प्रमाण अधिक आहे.याचा त्रास गर्भवती महिला व वृद्धाना अधिक होत आहेच तालुक्यातील असे महत्वाचे रस्ते किमान तात्काळ दुरुस्त होण्याची गरज आहे.या रस्त्याच्या नादुरुस्ती बाबत येथे येणारा प्रत्येक नागरिक नाराजी व्यक्त करत आहे.सावर्डा ते डेरवण हॉस्पिटल हा रस्ता वाहतुकीस पूर्णपणे नादुरुस्त बनत चालल्याची स्थिती आहे.या रस्त्याचे तात्काळ डांबरीकरण करावे अशी मागणी येथील नागरिकांमधून होत आहे.