आरगाव खालील वाडी ‌ येथील २८ वर्षीय तरुणाचा मृतदेह आढळला विहिरीत

लांजा ( प्रतिनिधी) :तालुक्यातील आरगाव खालील वाडी येथील २८ वर्षीय तरुणाचा मृतदेह घराजवळील विहिरीत आढळल्याची घटना आज शुक्रवारी सकाळी ११.०० वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेने खळबळ उडाली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, याबाबतची खबर विजय तुकाराम जाधव (वय ३८, राहणार आरगाव खालील वाडी) यांनी लांजा पोलीस ठाण्यात दिली आहे. आरगाव खालीलवाडी येथील मयूर प्रकाश जाधव (वय २८) या तरुणाच्या कमरेखालील शरीराच्या संवेदना कमी झाल्याने त्याच्यावर रत्नागिरी जिल्हा रुग्णालय तसेच पाली उपजिल्हा रुग्णालय या ठिकाणी उपचार सुरू होते.‌ उपचारानंतर सध्या तो घरी आला होता. आज शुक्रवारी सकाळी १०.३० वाजता तो आपल्या मोबाईलवर बोलत होता .त्यानंतर मोबाईल घरात ठेवून तो कोणालाही न सांगता निघून गेला होता.‌ त्यानंतर कुटुंबीय आणि नातेवाईक यांनी त्याची सर्वत्र शोधाशोध केली. याच दरम्यान त्याचा मृतदेह वाडीतील मनोहर खामकर यांच्या विहिरीत आढळून आला होता.
त्यानंतर त्याला लांजा ग्रामीण रुग्णालय येथे दाखल करण्यात आले होते.‌ या ठिकाणी दुपारी २.१० च्या सुमारास वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मृत घोषित केले.‌ मयूर जाधव या तरुणाच्या या दुर्दैवी मृत्यूने आरगावातून हळहळ व्यक्त केली जात आहे.‌
या घटने प्रकरणी लांजा पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल आशिष शेलार हे करत आहेत.