राजापूर तालुका काँग्रेस कमिटीची आढावा बैठक संपन्न

राजापूर तालुका काँग्रेसच्या बैठकीत नुतन तालुका अध्यक्ष सतीश बंडबे यांचा सत्कार करताना काँग्रेस पदाधिकारी व मान्यवर.
नवनिर्वाचित तालुका अध्यक्ष सतीश बडंबे यांचा सत्कार

राजापूर प्रतिनिधी राजापूर तालुका काँग्रेस कार्यकारणीची महत्वपुर्ण बैठक शुक्रवारी २ ऑक्टोबर रोजी काँग्रेसच्या संपर्क कार्यालयात पार पडली. तालुका अध्यक्ष सतीश बडंबे व राजापूरच्या नगराध्यक्षा ॲड. हुस्नबानू खलिफे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या बैठकीत राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लाल बहाद्दूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांना आदरांजली अर्पण करण्यात आली. यावेळी नवनियुक्त तालुकाध्यक्ष सतीश बंडबे यांचा सत्कार देखील करण्यात आला.

या बैठकीवेळी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते सुरेंद्र तांबे (गुरुजी) यांना ७५ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. नवनियुक्त तालुकाध्यक्ष सतीश बंडबे यांच्या नेतृत्वाखाली नवीन कार्यकारिणी कशी तयार करावी याबाबत सविस्तरपणे चर्चा करण्यात आल्यानंतर सविस्तर तालुका कार्यकारिणी तयार करण्यात आली. ही कार्यकारिणी पुढील आढावा बैठकीवेळी जाहीर करण्याचे ठरले. तसेच 5 ऑक्टोबर रोजी दक्षिण रत्नागिरी जिल्हा काँग्रेसची बैठक आयोजित करण्यात आली असून राजापूर तालुक्यातील जास्तीत जास्त कार्यकर्त्यांनी या बैठकीला उपस्थित रहावे असे आवाहन यावेळी करण्यात आले.

या बैठकीला काँग्रेस दक्षिण रत्नागिरी जिल्हाध्यक्ष ॲड. जमीर खलिफे, राजापूर नगर वाचनालयाचे माजी अध्यक्ष तथा ज्येष्ठ काँग्रेस कार्यकर्ते देवदत्त वालावलकर, राजापूर शहराध्यक्ष अजीम जैतापकर, राजापूर अर्बन बँकेचे माजी संचालक लियाकत काझी, नगरसेवक सुलतान ठाकूर, सिद्धांत जाधव, नगरसेविका शबाना मुल्ला, अमिना गडकरी, जान्हवी वादक, काँग्रेस कार्यकर्त्या अफरोज झारी, स्वीकृत नगरसेवक महेश शिवलकर, कार्यकर्ते अदनान खलिफे, इम्रान मुजावर, हारून साठी, सुरेंद्र तांबे आदी मान्यवर पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.