देवरूख (प्रतिनिधी)
संगमेश्वर तालुक्यातील देवरूख शहरासह परिसरात ऑनलाईन फसवणुकीच्या घटनांचे सत्र सुरूच असून सायबर गुन्हेगारांनी नागरिकांना लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे. कालच इंस्टाग्रामवरील एका फेक प्रोफाइलद्वारे तरुणाला ५४ हजार रुपयांचा गंडा घातल्याची घटना ताजी असतानाच पुन्हा एका ६० वर्षीय वृद्धाला सायबर भामट्यांनी तब्बल ९४ हजार ८०० रुपयांना लुटल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, भामट्यांनी विविध आमिषे दाखवून व ऑनलाईन जाळ्यात ओढून या वृद्धाची मोठी आर्थिक फसवणूक केली. अवघ्या २४ तासांत एकापाठोपाठ एक घडलेल्या या दोन मोठ्या घटनांमुळे देवरुख आणि आसपासच्या परिसरात तीव्र खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. याप्रकरणी पीडित ६० वर्षीय व्यक्तीने तत्काळ देवरुख पोलीस ठाण्यात धाव घेतली असून, पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्याचे काम उशिरापर्यंत सुरू होते. ऑनलाईन व्यवहार करताना, अनोळखी लिंक्स, सोशल मीडियावरील संशयास्पद प्रोफाइल किंवा बँकेच्या नावाखाली येणाऱ्या फेक कॉल/मेसेजवर अजिबात विश्वास ठेवू नका. कोणतीही वैयक्तिक माहिती अथवा OTP कोणासोबतही शेअर करू नका, असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून वारंवार केले जात आहे.













