सावंतवाडीमध्ये २५ रोजी स्मृती परिषदेचे आयोजन ; विविध मान्यवरांची उपस्थिती.. 

सावंतवाडी । प्रतिनिधी : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या तत्कालीन सावंतवाडी संस्थान भेटीला यावर्षी ९४ वर्षे पूर्ण होत असल्याने या भेटीच्या स्मृतीला उजाळा देण्यासाठी समता प्रेरणाभूमीच्या वतीने सावंतवाडी येथे रविवार, दि. २५ ऑक्टोबर रोजी स्मृती परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.

सदर स्मृती परिषदेचे उद्घाटन सावंतवाडी संस्थानच्या वारस तथा सावंतवाडी नगरपालिकेच्या नगराध्यक्ष सौ श्रद्धा भोसले यांच्या हस्ते व उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे .यावेळी नगरपालिकेचे मुख्याधिकारी विनायक औंधकर हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार असून कार्यक्रमाचे अध्यक्ष सावंतवाडी समता प्रेरणाभूमी संवर्धन समितीचे अध्यक्ष डी. के. पडेलकर हे राहणार आहेत.

याबाबतचे वृत्त असे की, तत्कालीन सावंतवाडी संस्थानातील पडवे गावचे जमीनदार खोत वराडकर यांच्या खून प्रकरणाची सुनावणी तत्कालीन सावंतवाडी संस्थानचे अधिपती पंचम खेमराज उर्फ बापूसाहेब महाराज यांच्या न्यायालयात सुनावणी सुरू होती. याप्रकरणी न्यायालयीन कामकाजासाठी आरोपीचे वकील म्हणून भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव बाबासाहेब आंबेडकर हे सावंतवाडी येथे आले होते. या दरम्यान खटल्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच दि. २२ ऑक्टोबर १९३२ रोजी राजापूर ते गोवा हद्दीतील अस्पृश्य समाजाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सन्मानार्थ व स्वागतार्थ एका जाहीर सभेचे आयोजन केले होते. या ऐतिहासिक सभेचे अध्यक्ष सावंतवाडी संस्थांनचे दिवाण मा. घोरपडे साहेब हे होते.या घटनेला उजाळा देण्यासाठी सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

.सदर कार्यक्रम दि. २५ ऑक्टोबर रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृति उद्यान तथा समता प्रेरणा भूमी येथे सकाळी ११ ते १ या वेळेत आयोजित करण्यात आला आहे. यावेळी देवगड बौद्धजन संघाचे अध्यक्ष श्यामसुंदर जाधव ,भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हा अध्यक्ष आनंद कासारडेकर, भारतीय बौद्ध महासभा जिल्हाध्यक्ष (राजरत्न आंबेडकर ) आनंद धामापूरकर मालवण तालुका बौद्ध सेवा समितीचे अध्यक्ष समाजभूषण संदीप कदम,कणकवली बौद्ध विकास संघाचे सचिव -संजय कदम, कुडाळ तालुका बौद्ध विकास संघाचे सचिव- संजय कदम, सिंधुदुर्ग बौद्ध हितवर्धक महासंघाचे मधुकर तळवणेकर, त्रिरत्न बौद्ध महासंघाचे अभय पावस्कर ,देवगड बौद्धजन संघाचे सेक्रेटरी मनोहर सावंत , खारेपाटण बौद्धजन सेवा संघाचे चंद्रकांत कांबळे, वैभववाडी तालुका बौद्ध सेवा संघाचे अध्यक्ष भास्कर जाधव, दोडामार्गचे सुरेश जाधव, सावंतवाडी समाज प्रबोधन समन्वय समितीचे अध्यक्ष जगदीश चव्हाण, गोवा येथील प्रा. डॉ. उल्हास चांदेलकर ,मिलिंद माटे साहित्यिक चंद्रकांत जाधव, इत्यादी उपस्थित राहणार आहेत पहिले सत्र सकाळी ११ ते दु. १ तर दुपारच्या सत्रात प्रबोधन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

यावेळी नागपूर येथील सुप्रसिद्ध व्याख्यात्या धम्म संगिनी रमा गोरख यांचे विशेष व्याख्यान होणार आहे. या कार्यक्रमाला आंबेडकरी अनुयायानी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन या परिषदेचे निमंत्रक तथा समता प्रेरणाभूमीचे सचिव मोहन जाधव यांनी केले आहे.