खामशेत ग्रामपंचायतचा राज्यस्तरीय उत्कृष्ट ग्रामपंचायत पुरस्कारात द्वितीय क्रमांक

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान

गुहागर प्रतिनिधी:
ग्रामविकासाच्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत गुहागर तालुक्यातील खामशेत ग्रामपंचायतीने महाराष्ट्रात द्वितीय क्रमांक पटकावला आहे. मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान 2026-27 अंतर्गत नाशिक येथे आयोजित पुरस्कार सोहळ्यात खामशेत गावाला महाराष्ट्रातील उत्कृष्ट ग्रामपंचायत म्हणून द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या यशामुळे गुहागर तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , पंचायत राज व ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे , विधान परिषद सभापती प्राध्यापक राम शिंदे , जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, आणि अन्न व प्रसाधन मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
यावेळी खामशेत गावचे सरपंच मंगेश सोलकर यांनी पुरस्कार स्वीकारला. त्यांच्यासोबत पंचायत समिती गुहागरचे सभापती प्रणव पोळेकर, उपसभापती निलेश सुर्वे, तसेच पंचायत समिती व ग्रामपंचायतीमधील अधिकारी वर्ग उपस्थित होता.खामशेत ग्रामपंचायतीने मिळवलेले हे यश म्हणजे गावाच्या विकासासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांना मिळालेली राज्यस्तरीय पावती मानली जात आहे. या पुरस्कारामुळे खामशेत गावाची ओळख राज्याच्या नकाशावर ठळक झाली असून, गुहागर तालुक्यातील इतर ग्रामपंचायतींसाठीही ही कामगिरी प्रेरणादायी ठरणार आहे.
खामशेतच्या या यशाबद्दल ग्रामस्थ, लोकप्रतिनिधी आणि ग्रामपंचायत प्रशासनाचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे.