मृत्युमुखी पडलेल्या तीन बालकांचे सोमवारी सकाळी दफनविधी
राजापूर प्रतिनिधी : तालुक्यातील नाणार इंगळवाडी येथे खाडीत रविवारी दुपारी बुडालेल्या त्या चार पैकी तीन बालकांचे रविवारी रात्री मृतदेह सापडल्यानंतर सोमवारी सकाळी त्यांच्यावर नाणार इंगळवाडी येथील दफन भूमित दफन विधी करण्यात आले. मात्र बुडालेल्या त्या चौथ्या मुलीचा शोध अद्यापही सुरूच आहे.
नाणार इंगळवाडी येथे खाडीत मुळे (कालवे) काढण्यासाठी आई-वडिलांसोबत गेलेल्या एकाच कुटुंबातील पाच मुले खाडीच्या खोल पात्रात बुडाली. यातील एका मुलीला वाचवण्यात यश आले होते. तरी एका मुलासह तीन मुली असे चार जण बुडाले होते यापैकी दोन मुली व एका मुलाचा असा तिघांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले होते. यामध्ये मोहम्मद जुनेद भाटकर (वय ६ वर्षे, मुलगा) ,जुहेरिया जुनेद भाटकर (वय ९ वर्षे, मुलगी) व बुशिरा जुनेद भाटकर (वय ११ वर्षे, मुलगी) यांचा समावेश आहे. यांच्यावर सोमवारी सकाळी दफनविधी करण्यात आले आहेत.
तर माहिरा जुनेद भाटकर (वय १५ वर्षे, या चौथ्या मुलीचा शोध अद्यापही सुरू आहे. नाटेसागरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांसह त्यांचे सहकारी स्थानिकांच्या मदतीने सोमवारी सकाळ पासून ही शोध मोहिम राबवत आहेत.
या घटनेमुळे नाणार इंगळवाडीवर शोककळा पसरली असून जुनेद भाटकर व त्यांच्या पत्नी हिना भाटकर यांना डोळयादेखच चार मुले बुडाल्याने जबर धक्का बसला आहे.













