सात दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी
आत्महत्या की घातपात, तपासातून उलगडा होणार
कणकवली : महिला पोलीस हवालदार स्मिता सचिन माने यांच्या मृत्यू प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आलेले त्यांचे पती सचिन अशोक माने यांना आज कणकवली न्यायालयात हजर करण्यात आले. स्मिता यांच्या मृत्यूमागील नेमके कारण शोधण्यासाठी तसेच तक्रारीतील आरोपांची पडताळणी करण्यासाठी पोलिसांनी सात दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी केली.
स्मिता माने यांच्या बहिणीने दिलेल्या फिर्यादीत सचिन माने यांच्याकडून शारीरिक व मानसिक छळ तसेच मारहाण होत असल्याचे आरोप करण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर पती-पत्नीमध्ये भांडणे नेमकी कधीपासून होत होती, मारहाणीचे प्रकार घडले होते का, याची चौकशी पोलिसांना करायची आहे. तसेच स्मिता यांचा मृत्यू आत्महत्या आहे की घातपात, त्यांना अन्य कोणत्या अवजाराने किंवा हत्याराने मारहाण झाली होती का, यासह विविध बाबींचा तपास करण्यात येणार आहे.
या प्रकरणात मुलाकडे चौकशी करून त्याने सांगितलेल्या कथित माहितीची पडताळणी करणेही महत्त्वाचे मानले जात आहे. स्मिता यांचा मृत्यू नेमका कोणत्या परिस्थितीत झाला, याचा उलगडा करण्यासाठी पोलिसांकडून विविध शक्यतांच्या अनुषंगाने तपास सुरू आहे. न्यायालयाकडून पोलीस कोठडीबाबत काय निर्णय दिला जातो, याकडे लक्ष लागले आहे.












