कुळ्ये येथील नवलाई मंदिरात चोरी; अज्ञात चोरट्याने दानपेटी फोडून रोकडसह सीसीटीव्हीचा डीव्हीआरही केला लंपास

देवरूख पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

देवरूख (प्रतिनिधी)

संगमेश्वर तालुक्यातील कुळ्ये-साळवीवाडी येथील नवीन नवलाई मंदिरामध्ये अज्ञात चोरट्याने डल्ला मारत गाभाऱ्याबाहेरील स्टीलची दानपेटी फोडून रोख रक्कम तसेच चोरीचा पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने थेट सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा डीव्हीआर आणि हार्डडिस्क पळवून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी देवरुख पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ही चोरीची घटना १ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी ४ वाजल्यापासून ते २ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी १०.३० वाजण्याच्या दरम्यान घडली होती. चोरट्याने मंदिरात प्रवेश करून गाभाऱ्याबाहेर ठेवलेल्या स्टीलच्या दानपेटीचे कुलूप तोडून त्यातील अंदाजे दोन हजार रुपयांची रोकड लंपास केली; तसेच आपली ओळख पटू नये यासाठी मंदिरात बसवलेल्या सीसीटीव्ही यंत्रणेची सुमारे साडेसात हजार रुपये किमतीची जुनी वापरती डीव्हीआर व हार्डडिस्कही चोरून नेली. या चोरीत एकूण ९ हजार ५०० रुपयांचा ऐवज लंपास झाला आहे.

सध्या सुरू असलेल्या नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने कुळ्ये गावच्या मुंबई मंडळाचे पदाधिकारी व सदस्य गावी आल्यानंतर या घडलेल्या चोरीच्या प्रकाराबाबत ग्रामस्थांच्या बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. त्यानंतर मूळचे कुळ्ये साळवीवाडी येथील रहिवासी व सध्या संगम सोसायटी, रूम नं. ६१२, सिद्धीविनायक मंदिरासमोर, भटवाडी, घाटकोपर (पश्चिम), मुंबई येथे वास्तव्यास असलेले अनिल राजाराम साळवी (वय ६४) यांनी बुधवार, दि. १४ ऑक्टोबर २०२६ रोजी देवरुख पोलीस ठाण्यात अधिकृत फिर्याद दाखल केली. ग्रामस्थांच्या चर्चेअंती विलंबाने दिलेल्या या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा रजिस्टर क्र. १५८/२०२६ नुसार गुन्हा दाखल केला असून, देवरुख पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.