सावंतवाडी :
सावंतवाडी नगर परिषदेच्या पाठीमागे मोबाईलवरून कल्याण नावाचा मटका जुगार चालवणाऱ्या एका
व्यक्तीवर सावंतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सावंतवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली असून, पोलिसांनी घटनास्थळावरून ११ हजार २०० रुपयांची रोकड व जुगाराचे साहित्य जप्त केले आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनांक ३० ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारी १२:३० वाजण्याच्या सुमारास सावंतवाडी नगर परिषदेच्या पाठीमागे ही कारवाई करण्यात आली. आरोपी प्रवीण प्रमोद खटावकर (वय ३५ वर्षे, रा. कोलगाव चव्हाटावाडी, सावंतवाडी) हा स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी मोबाईलच्या माध्यमातून कल्याण नावाचा मटका जुगार खेळवत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. याप्रकरणी सावंतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद क्रमांक २९४/२०२६ नुसार महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम १८८७ चे कलम १२ (अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाची फिर्याद सावंतवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार साहेबराव प्रकाश भुजबळ (पीसी/६७४, वय ३० वर्षे) यांनी दिली असून, दाखल अंमलदार म्हणून महिला हवालदार परब (डब्लूएचसी/३८५) यांनी काम पाहिले आहे. तसेच या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हवालदार धुरी करत असून, पोऊनि श्री. अविनाश पाटील यांनी घटनास्थळाला भेट दिली होती. पोलिसांनी आरोपीला भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (BNNS) कलम ३५(३) प्रमाणे नोटीस बजावली आहे.









