राजापूर अर्बन बँकेच्या उत्कर्षासाठी कायमच कटीबध्द- आ. किरण सामंत

मी व पालकमंत्री ना. उदय सामंत राजापूर अर्बनच्या खंबीरपणे पाठीशी
सहकारात राजकारण नको, भविष्यात बँकेची निवडणूक बिनविरोध व्हावी
राजापूर अर्बन बँकेच्या क्यू आर कोड सेवेचा आ. सामंत यांच्या हस्ते शुभारंभ

राजापूर (प्रतिनिधी): सर्वसामान्य कष्टकरी जनता, शेतकरी, छोटे मोठे व्यापारी आणि यांची हक्काची बँक अशी राजापूर अर्बन बँकेची ओळख आहे. १०६ वर्षाची गौरवशाली परंपरा असलेल्या या बँकेने सहकाराच्या माध्यमातुन आर्थिक उन्नतीला हातभार लावलेले आहे. आज बँक सुरू करत असलेली क्यू आर कोड सुविधा ही निश्चितच ग्राहक आणि बँकेच्या प्रगतीचा महत्वाचा टप्पा आहे. त्यामुळे भविष्यातही या बँकेच्या उत्कर्षासाठी आपण व पालकमंत्री ना. उदय सामंत यांच्या माध्यमातुन आवश्यक ते सर्व सहकार्य करून राजापूर अर्बन बँकेच्या नावलौकिकात भर घालण्याचा प्रामाणिक प्रयत्न करू अशी ग्वाही आमदार किरण सामंत यांनी दिली.
सहकारात राजकारण नसावे या मताचे आपणही आहोत, त्यामुळे भविष्यात राजापूर अर्बन बँकेची निवडणूक ही सगळयांनी एकत्र येऊन बिनविरोध करूया असे आवाहनही यावेळी आ. सामंत यांनी केले.
राजापूर अर्बन बँकेच्या क्यु आर कोड सेवा शुभारंभ व व्यापारी ग्राहक मेळाव्यात आ. सामंत बोलत होते. पंचायत समितीच्या किसान भवन सभागृहात बँकेचे अध्यक्ष एड. शशिकांत सुतार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी व्यासपीठावर राजापूर तालुका व्यापारी संघाचे अध्यक्ष संदिप मालपेकर, उपसभापती अभिजित गुरव, शिवसेना उपजिल्हा प्रमुख अशफाक हाजू, शिवसेना तालुका प्रमुख दिपक नागले, गटविकास अधिकारी रोहीत कुंभार, जिल्हा बँक संचालक मंदार सप्रे, बँकेचे उपाध्यक्ष विवेक गादीकर, व्यवस्थापन मंडळ अध्यक्ष अनिलकुमार करंगुटकर, मुख्य कार्यकारी अधिकारी शेखरकुमार अहिरे आदी मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी बोलताना आ. सामंत यांनी राजापूर अर्बन बँकेने आधुनिकतेची कास धरत केलेली प्रगती नक्कीच कौतुकास्पद आहे. मधल्या काळात बँकेला कठीण परिस्थितीतुन सामोरे जावे लागले आहे. मात्र हा कठीण काळही निघून जाईल, कारण समस्त राजापूरकरांचे भूषण असलेली ही बँक आहे. यासाठी जिल्हा बँकेचे अध्यक्ष डॉ. तानाजीराव चोरगे यांनी सर्वोतोपरी सहकार्याची ग्वाही बँकेला यापुर्वीच दिलेली आहे. मात्र आपण आणि पालकमंत्री ना. उदय सामंत आंम्ही दोघेही राजापूर अर्बन बँकेच्या खंबीरपणे पाठीशी आहोत, या बँकेला गतवैभव प्राप्त करून देताना बँकेच्या प्रगतीसाठी सदैव तत्पर असू अशी ग्वाही आ. सामंत यांनी यावेळी दिली.
तर उपसभापती अभिजित गुरव यांनी आपल्या भाषणात सहकारात राजकारण नको या मांडलेल्या मुद्दयाशी आपणही सहमत असून भविष्यात सगळयांनी एकत्रित येऊन बँकेची निवडूक बिनविरोध करूया नव्हे सभासद हे काम नक्की करतील असे आ. सामंत यांनी यावेळी नमुद केले.
प्रास्ताविकात शेखरकुमार अहिरे यांनी बँकेच्या प्रगतीबाबत आढावा घेतला. तर आपल्या अध्यक्षीय भाषणात एड. शशिकांत सुतार यांनी कठीण परिस्थितीत मार्ग काढताना बँक करत असलेले काम मांडले. यापुढे कुणालाही चुकीची माफी नसल्याचे नमुद करत आ. किरण सामंत यांचा हात आमच्या पाठीवर असल्याने भविष्यात बँकेची अधिक चांगली प्रगती होईल असा विश्वास व्यक्त केला.
याप्रसंगी व्यापारी संघाचे अध्यक्ष संदीप मालपेकर यांनीही बँकेच्या या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या. राजापूर अर्बन बँक ही शेतकरी व व्यापाऱ्यांची आहे, तीच्या प्रगतीसाठी आपण सगळयांनी सामूहिक प्रयत्न करूया असे आवाहन केले. तर उपसभापती अभिजित गुरव यांनी बँकेच्या कामाचे कौतुक करत शुभेच्छा दिल्या. भविष्यात आर्थिक ध्येय धोरणांची जाण असलेली माणसं बँकेच्या संचालक मंडळात गेली पाहिजेत, सहकारात राजकारण येता कामा नये यासाठी आ. किरण सामंत यांनी पुढाकार घ्यावा अशी भूमिका मांडली. यावेळी बँकेचे माजी अध्यक्ष जयप्रकाश नार्वेकर, एड. यशवंत कावतकर, बँकेचे संचालक दिनानाथ कोळवणकर, ज्येष्ठ सभासद धनंजय उर्फ दादा मराठे यांनीही मनोगत व्यक्त करत शुभेच्छा दिल्या.
प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. यानंतर आ. किरण सामंत यांच्या हस्ते बँकेच्या क्यू आर कोड सेवेचा शुभारंभ करण्यात आला. आभार अनिलकुमार करंगुटकर यांनी मानले.
याच कार्यक्रमात बँकेचे अध्यक्ष एड. शशिकांत सुतार यांचे वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन करण्यात आले. तर आ. सामंत यांचाही बँकेच्या वतीने सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाला बँकेचे सर्व संचालक, अधिकारी व कर्मचारी वर्ग, जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य, राजापूर शहर व तालुका परिसरातील व्यापारी, बँकेचे ग्राहक वर्ग मोठया संख्येने उपस्थित होते.