मंत्री नितेश राणे यांच्या कठोर भूमिकेमुळे आणि विभागाच्या चिकाटीमुळे कार्यवाही यशस्वी; स्थानिक मच्छिमारांमध्ये समाधान
देवगड,: महाराष्ट्राच्या सागरी हद्दीत घुसखोरी करून बेकायदा मासेमारी करणाऱ्या परप्रांतीय नौकांविरुद्ध मत्स्यव्यवसाय विभागाने पुन्हा एकदा कठोर कारवाई केली आहे. कर्नाटकातील मलप्पे बंदरातील ” सुलतान (Sulthan)” ही ट्रॉलर नौका देवगडसमोरील सागरी हद्दीत पकडून जप्त करण्यात आली. ही नौका देवगड बंदरात आणण्यात आली असून तिच्यावर कायदेशीर कार्यवाही सुरू आहे.
*मध्यरात्री समुद्रात थरारक कारवाई*
दि. २ नोव्हेंबर २०२६ रोजी रात्री सुमारे २३.०० वाजता नियमित गस्तीदरम्यान ही कारवाई झाली. मुणगे समोरील समुद्रात सुमारे ५-६ नॉटिकल मैल अंतरावर ही नौका वैध परवान्याशिवाय ट्रॉलिंग पद्धतीने मासेमारी करताना आढळली. विभागाची नौका पाहताच सदर नौकेने पळ काढला होता. सदर नौकेस पाठलाग करून देवगड समोरील समुद्रात पकडण्यात आले. महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम, १९८१ आणि सुधारित अधिनियम, २०२१ मधील तरतुदींनुसार नौका पाठलाग करून ताब्यात घेऊन जप्त करण्यात आली. नौकेवर तांडेलसह एकूण सात खलाशी होते. नौका सुरक्षितपणे देवगड बंदरात आणल्यानंतर रात्री उशिरापर्यंत कायदेशीर कार्यवाही सुरू होती. संपूर्ण प्रकरणाचा सविस्तर अहवाल सहाय्यक आयुक्त, मत्स्यव्यवसाय, सिंधुदुर्ग यांच्याकडे सादर करण्यात येणार आहे.
*जप्त नौकेची माहिती*
*नौकेचे नाव:* ” सुलतान (Sulthan)”
*नोंदणी क्रमांक:* IND-KA-02-MM-6335
*मालक:* श्रीमती. गुलफाम अब्दुल मुनाफ
*पत्ता*: पुत्तूर जि. उडुपी, कर्नाटक
*परवाना*: केवळ EEZ क्षेत्रासाठी वैध
मलप्पे बंदरातील नौकांकडून स्थानिक मच्छिमार यांची वारंवार जाळी तोडली जात असल्याची तक्रार मालवण व देवगड परिसरातील स्थानिक मच्छिमारांनी केली होती. त्यानंतर विभागाचे अधिकारी अनेक दिवसांपासून मलप्पी बंदरातील महाराष्ट्राच्या जलधी क्षेत्रात मासेमारी करणाऱ्या नौकेचा मागोवा घेत होते. गेल्या पाच दिवसांत दोन वेळा महाराष्ट्राच्या जलधी क्षेत्रात मासेमारी करणाऱ्या मलप्पी नौका पकडण्याचा प्रयत्न झाला. मात्र सदर मासेमारी नौका गस्ती नौकेपेक्षा अधिक क्षमतेची असल्याने दोन्ही वेळा थोडक्यात निसटल्या होत्या असे समजते. तरीही अधिकाऱ्यांनी हार न मानता पाठलाग सुरू ठेवला आणि अखेर तिसऱ्या प्रयत्नात महाराष्ट्राच्या जलधी क्षेत्रात मासेमारी करणारी मलप्पी नौका विभागाच्या ताब्यात आली.
*मंत्री नितेश राणे यांचे बारकाईने लक्ष*
मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे हे विभागाच्या कार्यवाहीवर सतत बारकाईने लक्ष ठेवून आहेत. परप्रांतीय नौकांच्या घुसखोरीविरुद्ध त्यांनी सुरुवातीपासूनच कठोर भूमिका घेतली आहे. त्यांच्या या ठाम भूमिकेमुळे विभागाच्या कारवाईला बळ मिळाले असून स्थानिक मच्छिमारांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
*कार्यवाही करणारे पथक*
सदर कार्यवाही मालवणचे अंमलबजावणी अधिकारी श्री. प्रतीक महाडवाला आणि देवगडचे अंमलबजावणी तथा परवाना अधिकारी श्री. किरण वाघमारे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ‘शीतल’ गस्ती नौकेद्वारे ही कारवाई यशस्वीपणे पार पाडली. सागरी सुरक्षा पर्यवेक्षक व रक्षक दीपेश मायबा, दिवाकर, संतोष टुकरुल, धाकोजी खवले, अल्पेश नेसवनकर आणि स्वप्नील सावजी यांनी त्यांना महत्त्वपूर्ण सहकार्य केले. ही कारवाई सहाय्यक आयुक्त, मत्स्यव्यवसाय, सिंधुदुर्ग श्री. सागर कुवेसकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
*विभागाची कौतुकास्पद कामगिरी*
रात्रीच्या अंधारात भर समुद्रात, अधिक वेगवान नौकेचा पाठलाग करून तिला पकडणे सोपे नव्हते. दोन वेळा अपयश येऊनही अधिकारी खचले नाहीत. त्यांची ही चिकाटी, धाडस आणि कर्तव्यनिष्ठा खरोखरच कौतुकास्पद आहे. परप्रांतीय नौकेवर झालेली ही दुसरी मोठी कारवाई आहे. यावरून विभागाची कारवाई सातत्यपूर्ण आणि शिस्तबद्ध असल्याचे स्पष्ट होते.
या कारवायांमुळे स्थानिक मच्छिमारांचे आर्थिक हित सुरक्षित राहत आहे आणि सागरी जैवविविधतेचेही प्रभावी संरक्षण होत आहे. नवीन गस्ती नौका उपलब्ध झाल्यानंतर कारवाई अधिक वेगाने होईल आणि स्थानिक मच्छिमार निर्धास्तपणे मासेमारी करू शकतील, असा विश्वास विभागाने व्यक्त केला आहे. बेकायदा मासेमारीविरुद्ध ‘शून्य-सहनशीलता’ धोरण यापुढेही कायम राहील, असेही विभागाने स्पष्ट केले आहे.













